मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलीय. मात्र वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसल्यानंतर आता विशिष्ट जातीच्या काही पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्धार केलाय. मात्र वंचितचा हा डाव पुन्हा एकदा भाजपासारख्या पक्षाला मदत करण्यासाठी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विधानसभा निवडणुकांची घोषणा आणि आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असताना राज्यात निवडणुकांचे पडघम जोरदार वाजू लागलेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असताना राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे यावेळीही तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न करण्यात आलाय.
10 मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवार : खरं तर वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यावेळीसुद्धा छोट्या राजकीय पक्षांनी फारसा प्रतिसाद दिला नाहीय. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा छोट्या पक्षांना साद घालून आपला वेगळा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यामध्ये आदिवासी गोंडवाना पार्टी आणि ओबीसी संघटनांना त्यांनी सोबत घेतलंय, त्या पाठोपाठ आता अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना आणि संस्थांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच वंचितची दुसरी यादी जाहीर केली असून, या यादीत मुस्लिम उमेदवारांची नावे आहेत. राज्यातील 10 मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवार देण्यात आलेत. तर त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतसुद्धा काही मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आलीय. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुस्लिम मतदारांच्या मतांचे विभाजन करून त्याचा एखाद्या विशिष्ट पक्षाला फायदा करून देण्याचा वंचितचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा सुरू झालीय. या संदर्भात चर्चा करताना वंचितचे नेते आणि प्रवक्ते फारुख अहमद यांनी मात्र याचा साफ शब्दात इन्कार केलाय.
मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणणार - अहमद : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रवक्ते फारूक अहमद म्हणाले की, वंचितला भाजपाची बी टीम म्हणून संबोधले जाते हा विरोधकांचा पोटशूळ आहे. फारुख अहमद यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी मुस्लिम मतदारांचा वापर करून घेतला, मात्र मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं नाही. कधीही मुस्लिम नेत्यांना त्यांनी मोठं होऊ दिलं नाही. आता अन्य पक्षातील आमदार आणि खासदार अन्य नेते आपल्या संपर्कात आहेत, मुस्लिम समाजाकडे आम्ही वोट बँक म्हणून बघत नाही, देशात विद्वेशाचे राजकारण करण्याचे काम भाजपा करीत आहे. त्याला उत्तर द्यायचं असेल तर मुस्लिम समाजाकडे सत्ता सोपवावी लागेल, असं मत फारुख अहमद यांनी व्यक्त केलंय. त्यांना आवाज देऊन सभागृहात न्यावे लागेल त्यासाठी त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. सत्ता मुस्लिम समाजाकडे वाटून दिली पाहिजे, ही वंचित आघाडीची भूमिका आहे. पक्ष स्थापनेपासून अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाने घेतलीय. अल्पसंख्याक समाजाला राजकारणात बाजूला सारलं जातंय. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आमचा पक्ष करीत आहे. त्यामुळे मुस्लिम उमेदवार तुम्हाला आमच्या पक्षाच्या यादीत यापुढेही दिसतील, असा दावाही त्यांनी केलाय.
भाजपाला मदत करण्याचा प्रयत्न - शिंदे : दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुस्लिम उमेदवारांच्या यादीवर बोलताना आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. धनंजय शिंदे म्हणाले की , राज्यातील अल्पसंख्याक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला जोरदार पाठिंबा दिलाय. संविधान वाचवण्यासाठी आणि देशांमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने महाविकास आघाडीची पाठराखण केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे पिछाडीवर गेलेल्या महायुतीतील नेत्यांनी मुस्लिम मतांचे विभाजन कसे होईल , याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलंय. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा आधार घेतल्याचे दिसते, कारण ज्या पद्धतीने वंचितने अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय ते पाहता याचा कुणाला तरी अप्रत्यक्ष फायदा व्हावा यासाठीच हा प्रयत्न असल्याचे दिसते, असेही शिंदे म्हणाले. मात्र महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आणि ओबीसी तसेच अन्य घटक हे आता सुज्ञ असून, कोणासोबत राहायचं याबाबत त्यांचा निर्णय पक्का झालाय. त्यामुळे महायुती किंवा जातीयवादी पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी आता त्यांचा पराभव निश्चित आहे, असेही शिंदे म्हणालेत.
हेही वाचा