छत्रपती संभाजीनगर Prahar on Sachin Tendulkar : बालभारती अभ्यासक्रमातील सचिन तेंडुलकर यांच्यावरील धडा वगळावा अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आलीय. भारत सरकारनं त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला असला तरी ते ऑनलाईन गेमिंग सारख्या जुगाराला चालना देणाऱ्या खेळाची जाहिरात करत असल्यानं, विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या गोष्टी घातल्या जातील. त्यामुळं त्यांचं भवितव्य लक्षात घेता हा धडा काढावा. तसंच ही मागणी पूर्ण न झाल्यास प्रहार संघटना राज्यभर तीव्र आंदोलन सुरू करेल, असा इशारा प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष संतोष राजगुरू यांनी दिलाय.
बालभारतीनं धडा वगळावा : बालभारतीच्या इयत्ता चौथीमध्ये पाठ क्रमांक 20 कोलाज पाठांतर्गत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल माहिती असलेला पाठ देण्यात आलेला आहे. या पाठात कोलाज उपक्रमातंर्गत सचिन तेंडुलकर यांचे वर्तनपत्रातील फोटो संकलंन आणि माहिती संकलंन करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मात्र सचिन तेंडुलकर हे समाजमाध्यमातून ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार सारख्या जाहिरात मोठ्या प्रमाणात करत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना तेंडुलकर यांच्याबद्दल विचारल्यावर ते क्रिकेटपेक्षा सचिन तेंडुलकर यांच्या ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार सारख्या जाहिराती बाबत माहिती सांगतात. सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेटपटू या प्रतिमेपेक्षा ऑनलाईन रमी ही प्रतिमा विद्यार्थी मनावर तयार होत आहे. इयत्ता चौथीतील बालवयातील या विद्यार्थ्यांच्या मनावर जाहिरातीचा परिणाम अधिक खोलवर होतोय. ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगार सारख्या समाज विघातक जाहिरातीत सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळं त्यांच्या जीवनावरील पाठ तातडीनं वगळून टाकावा अशी मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आलीय.
विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे सातत्यानं ऑनलाईन गेमिंग सारख्या जुगाराच्या जाहिराती करतात. त्यांचा अंगरक्षक प्रकाश कापडे यांनी ऑनलाइन गेमिंगच्या कर्जबाजारीपणामुळं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय. ज्या खेळाडूच्या अंगरक्षकाला या ऑनलाइन गेमिंगच्या जुगारामुळं आत्महत्या करावी लागते, त्या क्रिकेटपटूचे पाठ बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनावर किती विपरीत परिणाम करत असतील याचा विचार बालभारतीनं करुन, अभ्यासक्रमातील इयत्ता चौथीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ वगळण्यात यावा, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेनं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या संचालकांकडं निवेदनाद्वारे केलीय. तसंच या पाठाऐवजी कोलाज या पाठांतर्गत संगणक या विषयवर संकलन घटक घेतल्यास विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळेल. हे ज्ञान त्यांना पुढील भविष्य काळासाठी उपयोगी राहील अशीही मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरु यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलीय.
हेही वाचा :