नाशिक Leopard Skin Smuggling : नाशिकच्या इगतपुरी येथील बाबाला 'बाबागिरी' करण्यासाठी बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त केली. या प्रकरणात 5 संशयितांना अटक करण्यात आली. बिबट्याच्या कातडीची खरेदी करणारा बाबा फरार झाला. पोलीस त्याच्या मागावर आहेत.
सापळा रचून संशयितांना अटक : इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर-दऱ्या, धरणं, नदी, नाल्यांनी व्यापला आहे. या ठिकाणी वन्य प्राण्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित व्यक्ती अल्पवधीत पैसे कमावण्यासाठी अवैध व्यवसाय करत असतात. पिंपळगाव मोरगाव शिवारातील मोराचे डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित व्यक्ती बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित नामदेव पिंगळे, संतोष जाखिरे, रवींद्र आघाण, भाऊसाहेब बेंडकोळी आणि भगवान धोंडगे या पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी आणि एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय.
बाबाला पाहिजे होती बिबट्याची कातडी : पोलिसांनी सांगितलं की, संशयित नामदेव पिंगळे यानं दिलेल्या कबुलीनुसार दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी बिबट्याचं कातडं असलेली गादी बनवायची होती. त्या बदल्यात तो संशयितांना पैसेदेखील देणार होता. नामदेव पिंगळे हा या भागात गुरे चारण्याचं काम करत मोराच्या डोंगरावर जात असे. या ठिकाणी पाणी पिण्याच्या डोहाजवळ रात्रीच्या वेळी वन्यप्राणी येतात. येथे येणाऱ्या बिबट्याला मोटरसायकलच्या क्लजवायरच्या गळफासानं पकडून ठार मारलं. त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्याची कातडी काढून काही दिवस निर्जन ठिकाणी सुकत ठेवली. ही कातडी दिलीप बाबा याला विक्री करण्यासाठी घेऊन जाताना पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणात फरार झालेल्या दिलीप बाबाचा शोध सुरू असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची मोठी संख्या : गेल्या आठ ते दहा वर्षांत नाशिकच्या मानवी वस्तीत बिबट्या येण्याचं प्रमाण वाढलंय. या सर्वांना नाशिकची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. शेतात जन्म घेणाऱ्या बिबट्याला शुगर कॅन लेपर्ड असं म्हटलं जातं. जंगलात बिबट्याच्या मादीनं चार पिल्लांना जन्म दिला तर त्यातील दोन बछडे जगायचे. मात्र ऊसाच्या शेतीत जन्म दिलेले सर्व बछडे जगतात. ऊसाचं शेत त्यांना सर्वच दृष्टीनं पूरक असल्यानं बिबट्यांची संख्या वाढत असल्याचं वन विभागानं सांगितलंय.
हेही वाचा :