नागपूर : शनिवारी (23 नोव्हेंबर) होणाऱ्या मतमोजणीकरिता नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. मतमोजणी केंद्रावर जय्यत अशी तयारी सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. तर दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं मायक्रो प्लॅनिंग केलं आहे. नियमाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केलं.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार मतमोजणी : विधानसभा निवडणूक मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून निवडणूक विभाग-जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहिता 163 अन्वये जमाव बंदी आदेश निर्गमित केले आहेत. ज्यांना सुरक्षा पासेस देण्यात आलेले आहेत, त्यांनाच प्रवेश दिला जाईल. मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतुकीसह इतर सुरक्षिततेच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनानं स्पष्ट केलं.
नागपूर जिल्ह्यात 61.60 टक्के मतदान : विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी उत्साहानं मतदान केलं. नागपूर जिल्ह्यात 61.60 टक्के मतदान झालं. जिल्ह्यात 45 लाख 25 हजार 997 एकूण मतदार असून त्यापैकी 14 लाख 22 हजार 676 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर 13 लाख 65 हजार 491 महिलांनी मतदान केलं. पुरुषांची टक्केवारी 62.84 इतकी आहे, तर 60.37 टक्के महिलांच्या मतदानाची टक्केवारी आहे.
हेही वाचा