अमरावती : अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडी जंगलातील चिरोडी ते कारला मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून एक वर्ष वयाचा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री घडल्याचं सांगितलं जातंय. तर शनिवारी (7 डिसेंबर) पहाटे या घटनेसंदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पिल्लाचा मृतदेह त्याच्या आईनं केला बाजूला : रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमुळं बिबट्याचं पिल्लू रस्त्याच्या मधातच मृत अवस्थेत पडलं. पहाटे या पिल्लाच्या आईनं आपल्या बाळाचं मृत शरीर रस्त्याच्या कडेला आणून ठेवल्याचं या परिसरातील ग्रामस्थांनी पाहिलं, असा दावा त्यांनी केला. शनिवारी पहाटे चिरोडी आणि कारला येथील ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली असता घटनास्थळावरुन मृत बिबट्याची आई जंगलात पळाली.
वन विभागाचं पथक दाखल : घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सकाळी सात वाजता चिरोडी कारला मार्गावर असणाऱ्या घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर मृत बिबट्याला अंत्यसंस्कारासाठी वडाळी येथील बांबू उद्यान परिसरात आणण्यात आलं.
काळजी घेण्याची गरज : "अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा, मालखेड, चिरोडी या समृद्ध जंगल परिसरात गत अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. या जंगलात बिबट्यांची विपुल संख्या असून इतर वन्य प्राण्यांनी हे जंगल समृद्ध आहे. या जंगलातील मार्गांवर ठिकठिकाणी नागरिकांना सावधपणे वाहन चालविण्याचे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी या भागातून जाताना नागरिकांनी देखील आपल्या वाहनाची गती मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. या भागातील वन्य प्राण्यांसंदर्भात जनजागृतीची खऱ्या अर्थानं गरज आहे", असं राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलंय.
हेही वाचा -