कोल्हापूर Kolhapuri Chappal QR Code : कोल्हापुरची आन-बान-शान असलेली आणि कोल्हापुरच्या पारंपारिक रुबाबाचं प्रतीक म्हणून कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चपलेला आता 'क्यू आर' कोड दिला जाणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर ग्राहकांना चपलेची माहिती समजणार आहे. यामुळं बोगस कोल्हापुरी चपलेच्या विक्रीला आळा बसणार आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत चीप : एरवी लग्नकार्यात शेरवानी आणि सुटाबुटाच्या प्रेमात पडणारी तरुणाई आता कोल्हापुरी चपलेच्या पेहरावात दिसू लागलीय. त्यामुळं दिवसेंदिवस कोल्हापूरी चपलेची मागणी वाढू लागलीय. पण ग्राहकांना अस्सल आणि टिकाऊ कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळानं (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या जाणार आहेत. या तंत्रज्ञानात चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत एक छोटी चीप बसवलीय. ही चप्पल मोबाईलनं स्कॅन करताच ही चप्पल कुठं बनवली, कोणत्या कारागिराने बनवली ही माहिती मिळेल. त्यामुळं आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असली की नकली, हे ओळखता येणार आहे. चपलामध्ये अशाप्रकारे जगात प्रथमच तंत्रज्ञान वापरलं गेलंय.
काय आहेत चीपची वैशिष्ट्ये : कोल्हापूरी चपलेला लागणारं चामडं कुठून आणलं, ते कोणत्या प्राण्याचं आहे, आदी सर्व गोष्टींची माहिती ग्राहकांना मिळते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये वस्तूच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यत प्रत्येक गोष्टींची माहिती ठेवली जाते. हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस आणि रबरच्या विक्रीमध्ये केला गेलाय. यात शेतकऱ्यांचं नाव, पिकाचं नाव, शेतकऱ्यांकडून किती रुपयांना विकत घेतलं, ग्राहकांना किती रुपयांना विकणार, याची इत्थंभूत माहिती या चीपमध्ये असते. तसंच या तंत्रज्ञानाचा वापर दूध भेसळीला आळा घालण्यासाठी करण्यात आला. विशेष म्हणजे चप्पल विकत घेतल्यानंतर संगणकाच्या आधारे संबंधित ग्राहकाचं नावही त्या चीपमध्ये समाविष्ट केलं जात आहे. या माहितीमध्ये कोणालाही फेरबदल करता येत नाही. कोल्हापूर सह सीमा भागात बेळगाव कर्नाटकातून बोगस कोल्हापुरी चपला विक्रीसाठी येत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोल्हापूर चपलेला चीप लावण्यात येणार आहे, त्यामुळं अशा प्रकाराला आळा बसेल अशी माहिती कोल्हापूरी चपलेचे विक्रेते भुपाल शेटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
राज्य सरकारकडून संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या वतीनं मुंबईतील मंत्रालयात कोल्हापुरी चपलेचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करुन कोल्हापुरी चपलेला क्यू आर कोड देण्यात आलाय. लवकरच हे तंत्रज्ञान कोल्हापूरात उत्पादित होणाऱ्या कोल्हापुरी चपलेसाठी उपलब्ध होणार आहे. - एन. एम. पवार, व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ, कोल्हापूर
हेही वाचा :