कोल्हापूर Chikhal festival : एकीकडे मोबाईलच्या दुनियेत बालपण हरवत चाललंय, अशी ओरड होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीमधील एका हायस्कूलनं आगळावेगळा उपक्रम राबवत मातीशी नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोणताही संसर्ग होऊ नये. मैदानी खेळाची विद्यार्थ्यांना सवय लागावी. या हेतूनं कोल्हापूर येथील एका शालेत 'चिखल महोत्सव' साजरा करण्यात आला.
आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा असा हा 'चिखल महोत्सव' चांगलाच चर्चेत आला. धक्काधकीच्या जीवनात आपण मातीचे महत्त्वच विसरत चाललो आहोत. नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी यथेच्छ खेळणारे आपण मोठेपणी मातीपासून दूर राहतो. याच मातीची महत्त्व कळावे आणि मातीविषयी प्रेम जागृत करणारा 'चिखल महोत्सव' अर्थात 'मड फेस्टिव्हल'चं आयोजन या शाळेत करण्यात आलं होतं.
शिक्षकांनीही लुटला आनंद : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेत चक्क 'चिखल महोत्सव' भरवण्यात आला. चिखलात मनसोक्त लोळणाऱ्या या मुलांना पाहण्यासाठी अनेक भागातून आलेले माजी विद्यार्थी आणि गावकरी उपस्थिती होते. राधानगरी तालुक्यात सध्या दमदार पाऊस कोसळताना या पावसात आगळा वेगळा 'चिखल महोत्सव' झाला. आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची उब देऊन गेला. या महोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये, म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आलं. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही चिखल महोत्सवाचा आनंद लुटला.
विद्यार्थी मातीतल्या खेळाशी एकरूप : राधानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेत गेल्या चार वर्षांपासून चिखल महोत्सव भरवला जातो. या महोत्सवात शालेय विद्यार्थी तहानभूक हरवून चिखलात खेळण्याचा मनमुराद आनंद घेतात. मान्सून सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात राधानगरीसारख्या पर्जन्यमान जास्त असलेल्या तालुक्यात या महोत्सवाचा आयोजन करण्यात येतं. या महोत्सवातून मैदानी क्रीडा प्रकाराला चालना मिळत असल्याचं मुख्याध्यापक एस. डी कांबळे यांनी सांगितलं. तर खो-खो, कबड्डी, फुटबॉल यासारख्या खेळांना चालना मिळत आहे. अनेक खेळाडू जिल्हा आणि राज्य पातळीवर खेळातून हायस्कूलचं नाव मोठं करत असल्याचं समाधान असल्याची भावना शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा