कोल्हापूर Kolhapur assembly election 2024 -नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साखरपट्ट्यात आलेलं अपयश म्हणून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. त्यासाठीच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना शाह 'चार्ज' करणार आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीमधील 'मोठा भाऊ' होण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बँका, दूध संघ आणि संस्था, शेती उत्पन्न बाजार समिती असं सहकाराचे जाळ पसरलेलं आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाला हातपाय पसरण्यात अडचणी आल्या आहेत.
43 विधानसभा जागांसाठी आज होणार 'विचारमंथन'- कोल्हापूरसह पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाजपाचे शिलेदार आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे सांयकाळी 5 वाजता एकत्र जमणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शाह सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महायुतीतील घटक पक्षासह भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या 43 विधानसभा जागांवर विजयापर्यंत नेण्यासाठी अमित शाह पदाधिकाऱ्यांना धडे देणार आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्र मंडळ विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. शाह यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 5 जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे.
पक्षातील पडझड रोखण्याचं भाजपासमोर आव्हान- कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे महायुतीत अंतर्गत चव्हाट्यावर आली होती. तसेच जिल्ह्यातील भाजपाच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे भारतीय जनता पक्षासमोर पक्षातील पडझड रोखण्याचा आव्हान उभं टाकलं आहे.
हेही वाचा-