अमरावती Athlete Pushpa Chaudhary Special Story : 15 आणि 16 जून रोजी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हॅमर थ्रो आणि शॉट पुट (गोळाफेक) या खेळांत अमरावतीच्या पुष्पा त्र्यंबक चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम आणि तृतीय स्थान पटकावले. वयाच्या 75 व्या वर्षी देखील क्रीडा क्षेत्राबाबत पुष्पा चौधरी यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी सहज म्हणून खेळायला सुरुवात केली होती आणि आज त्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा गाजवत आहेत.
नर्सरीच्या संचालिका ते क्रीडापटूपर्यंतचा प्रवास : पुष्पा चौधरी या अमरावती शहरातील नावाजलेल्या गायत्री नर्सरीच्या संचालिका आहेत. 1993 मध्ये एका वृत्तपत्रात अमरावती शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या ठिकाणी मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा होणार असल्याबाबत त्यांनी बातमी वाचली. 35 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा असल्यामुळं त्यांनी या स्पर्धेत नेमकं काय राहणार या संदर्भात चौकशी केली.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर ज्या दिवशी सायंकाळी या स्पर्धा होणार होत्या त्या दिवशी सकाळी उठून पुष्पा चौधरी यांनी घराची सारी कामं केलीत. तसंच मुलांना शाळेत पाठवल्यानंतर घरी कोणालाही कळू न देता त्यांनी स्पर्धेत आपली नाव नोंदणी केली. या स्पर्धेतील 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. तसंच हॅमर थ्रो मध्ये रौप्य पारितोषिक तर भालाफेक मध्ये तृतीय पारितोषिक पटकावलं. त्यानंतर त्यांचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
वर्षभरात दोन वेळा स्पर्धा : मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर वर्षभरातून दोनदा होतात. 1993 पासून ते आतापर्यंत पुष्पा चौधरी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. 1996 मध्ये मलेशियात क्वालालंम्पूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुष्पा चौधरी सहभागी झाल्या होत्या. यानंतर 2008 मध्ये गोवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा, चंदीगड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आता यावर्षी श्रीलंकेत आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुष्पा चौधरी सहभागी झाल्या आहेत. यासोबतच दिल्ली, चंदिगड, बंगळुरू, कुरुक्षेत्र ,जबलपूर, धारवाड, मणिपूर, हिस्सार, ठाणे, डेहराडून, या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतल्याचं पुष्पा चौधरी यांनी सांगितलं. तसंच आता नोव्हेंबर महिन्यात नाशिक येथे केवळ महिलांसाठी मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये देखील सहभागी होणार असल्याचं त्या म्हणाल्या.
चाळीशी नंतर प्रत्येकानं जोपासावा छंद : वयाच्या चाळीशीनंतर आपलं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी प्रत्येकानं खेळण्याचा छंद जोपासायला हवा. यामुळं आपलं आरोग्य तर चांगलं राहातच, मात्र एक आगळावेगळा आनंद देखील आपल्याला अनुभवता येतो. तसंच खेळाच्या माध्यमातून आपल्याला नवीन मित्र भेटतात. त्यामुळं आपल्याला एक नवं कुटुंब मिळतं. 30 वर्षांपासून ते शंभर वर्ष वयापर्यंत प्रत्येक जण खेळू शकतो. त्यामुळं अशा छंदाचा प्रत्येकानं फायदा घ्यावा, असं आवाहनही पुष्पा चौधरी यांनी यावेळी केलं.
हेही वाचा -