मुंबई Karsevak Geetanjali Thackrey : 'अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरीचा ढाचा माझ्या डोळ्यासमोर पाडला गेला. समोरची ती इमारत पडल्यानंतर कारसेवकांनी आपण दिलेला झेंडा तिथं फडकवला. हा पाहणं आपल्यासाठी अभिमानाचं होतं. त्यामुळे डोळ्याचं पारणं फिटलं' अशा शब्दात गीतांजली ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.
कारसेवा म्हणजे काय माहिती नसताना बाहेर पडले : भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये रथयात्रा काढण्यात आली. त्यावेळी कारसेवेला प्रारंभ झाला. कारसेवेसाठी देशभरातून लोक अयोध्येकडे जात होते. जळगावमधून सुद्धा वेगवेगळ्या पथकांमधून लोक अयोध्येला गेले होते. गीतांजली यांच्या आई-वडिलांनी कारसेवेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गीतांजली यांनासुद्धा सोबत घेतलं. त्यावेळेस गीतांजली साडेनऊ वर्षांच्या होत्या. कारसेवा म्हणजे काय, हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. मात्र मी आई-वडिलांसोबत त्या प्रवासावर निघाल्या. सर्वात लहान कारसेविका म्हणून नोंद असलेल्या गीतांजली ठाकरेंनी या सगळ्या आठवणी सांगितल्या.
अक्षरशः घरावर तुळशीपत्र : गीतांजली ठाकरे यांनी सांगितलं की, त्यांच्यासह घरातील सर्वजण आयोध्याकडे मार्गस्थ झाले. त्यावेळी शेजारी बाबांना म्हणाले की तुम्ही तर सर्व कुटुंब घेऊन जात आहात. तेव्हा तिच्या बाबांनी सांगितलं होतं की, ते तर घरावर तुळशी पत्र ठेवून बाहेर पडत आहेत. त्यावेळी त्या वाक्याचा अर्थही समजत नव्हता असं गीतांजली यांनी सांगितलं. बालमनाच्या विचारातून त्या तर आईला म्हणाल्या होत्या की, घरासमोरील तुळशीची पानं छतावर ठेवायला विसरले. त्यावेळी आईनं छातीशी कवटाळल्याची आठवण अजूनही ताजी असल्याचं त्या सांगतात.
आम्ही सर्व कुटुंब रेल्वेनं वाराणसीपर्यंत पोहोचलो होतो. वाराणसीला पोहोचल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी गाड्या बदलाव्या लागल्या. कारण त्यावेळेस उत्तर प्रदेशात असलेल्या सरकारनं कारसेवेवर बंदी घातली होती. आमच्या सोबत असलेली दीपक आणि ज्योती घाणेकर कुटुंब भाईजी मुंदडा तसंच गोविंद आणि बस्ती सोनी यांची गाडी बदलली. आम्ही एकच कुटुंब फैजाबादकडे बसनं रवाना झालो. मात्र वाटेत आमच्या बसला आग लागली सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. - गीतांजली ठाकरे, कारसेविका
शरयूच्या काठी मंडप : अयोध्येजवळ पोहोचल्यानंतर शरयू नदीच्या काठी एका मंडपात राहिल्याची आठवणही गीतांजली यांनी सांगितली. कारसेवकांची व्यवस्था मंडपात करण्यात आली होती. त्यामुळं 5 डिसेंबर 1992 रोजी शरयू नदीच्या काठी असलेल्या मंडपात त्या थांबल्या होत्या. सकाळी कारसेवेसाठी जाण्यास उत्सुक होत्या, असंही त्या म्हणाल्या.
माझ्या हातातील झेंडा फडकला : बाबरीच्या वादग्रस्त जागेभोवती सगळे कारसेवक जमले होते. मोठ्या नेत्यांची भाषणं सुरू होती. मुरली मनोहर जोशी म्हणत होते की, आपण पुन्हा एकदा शांततेत सर्व काही आंदोलन करायचं आहे. मात्र, त्यांनी असं आवाहन करताच कारसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि कारसेवक अचानक उठून वादग्रस्त इमारतीकडे पळत सुटले. त्यावेळी गीतांजली यांच्या आईनं त्यांच्या हातात झेंडा दिला होता. कुणाला काही न कळता हा झेंडा त्या ठिकाणापर्यंत नेऊन दे असं त्यांना आईनं सांगितलं होतं. त्यांना कारसेवकांना झेंडा दिला. तेवढ्यात बेभान झालेले कारसेवक झेंड्यासह वादग्रस्त इमारत पाडू लागले. काहीजण या इमारतीवर चढत होते. त्यांच्या हाती गीतांजली यांनी दिलेला झेंडा होता. त्यांनी तो इमारतीवर फडकवला. त्यावेळी अत्यानंद झाल्याचं गीतांजली यांनी सांगितलं.
अयोध्येत दिवाळी : वादग्रस्त इमारत पाडताना प्रचंड गोंधळ सुरू होता. या गोंधळात गीतांजली आणि त्यांच्या आईवडिलांची ताटातूट झाली. त्यावेळी त्यांच्या परिचयाचे मुकुंद मेटकर त्यांना भेटल्याचं गीतांजली यांनी सांगितलं. त्यांनी मंडपात आणून आईकडे सोडल्याचीही आठवण त्यांनी सांगितली. वादग्रस्त इमारत पाडल्यानंतर त्या दिवशी अयोध्येत दिवाळी साजरी होत होती असंही ठाकरे यांनी सांगितलं. मिठाई आणि जय श्रीराम लिहिलेल्या विटा घेऊन कारसवेक परतायला लागले. त्यावेळी पोलिसांचा ससेमिरा मागे लागला होता. मात्र त्या सगळ्यांना चुकवून कसंतरी जळगावला पोहोचल्याचा अनुभव गीतांजली यांनी सांगितला. श्रीराम मंदिर आता उभारल्यानं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूप महत्वाचा असल्याचं ठाकरे म्हणाल्या.
हेही वाचा :