ठाणे Kalyan Crime: आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपी मित्राला भेटण्यासाठी आलेल्या दोघांनी त्याला गांजा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळं आरोपीला गांजा देण्याचा प्रयत्न फसला. औषधाच्या बाटलीतून गांजा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय? : कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या जेलमध्ये एक कैदी शिक्षा भोगत आहे. हा कैदी मोक्कातील आरोपी आहे. डोंबिवलीत राहणारे दोन तरुण गुरुवारी दुपारी आधारवाडी जेल जवळ आले. जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तुरुंग पोलिसाला या दोघांनी मित्राला औषधे द्यायची आहेत. आमची सर्व प्रक्रिया झाली आहे, असं सांगितलं. पोलिसांनी तपासणी करत औषधाची बाटली उघडली, असता त्यामध्ये गांजा असल्याचं समोर आलं. औषधांच्या नावावर जेलमध्ये बंद असलेल्या मोक्काचा आरोपी संकेत दळवी याला गांजा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय, अशी माहिती खडकपाडा पोलिसांनी दिलीय.
पोलिसांनी केली दोघांना अटक : "खडकपाडा पोलिसांनी प्रेम बर्डे आणि अविनाश जाधव या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघं डोंबिवलीत राहणारे आहेत. यांनी गांजा कुठून आणला, कोणाच्या सांगण्यावरुन मोक्काच्या आरोपीला गांजा पुरवत होते. याचा तपास आता खडकपाडा पोलिसांनी सुरु केलाय," अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिलीय.
हेही वाचा