पुणे Manorama Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दोन वर्षाच्या पूर्वी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आज मनोरमा खेडकर यांना पौडच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं खेडकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही वकिलांचा युक्तिवाद काय : आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षानं दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. त्याला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज झालेल्या सुनावणीत मनोरमा खेडकर यांचे साथीदार तसंच घटनास्थळावरील कंटेनर संबंधीचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अजय ननावरे यांनी केला. त्याचप्रमाणे आरोपीनं तक्रारदारांच्या डोक्याला पिस्तूल लावलं होतं आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावाही यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आल आहे. तर या प्रकरणामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं कलम 307 लागू होत नाही. ते कलम काढून टाकावं. उर्वरित कलमं जमीनपात्र आहेत. त्यामुळं पोलीस कोठडी वाढवण्यात येऊ नये असा युक्तिवाद आरोपीचे वकील सुधीर शहा यांनी केला.
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ : दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे. सुनावणी दरम्यान मनोरमा खेडकर यांनी त्यांना वेळेवर खायला दिलं जात असल्याची तक्रार न्यायालयासमोर केली. सकाळी चहा उशिरा दिला त्याचप्रमाणे दुपारचं जेवण उशिरा दिलं असं सांगितलं त्यावर न्यायालयानं सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे पोलिसांनी केली होती अटक : वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड इथून अटक केली होती. मनोरमा खेडकर या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील पार्वती निवास या घरगुती लॉजिंगमध्ये लपून बसल्या होत्या. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी पार्वती निवास इथं छापा घालून त्यांना अटक केली. त्यांनी जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर पिस्तूल बाहेर काढलं होतं, असा आरोप त्यांच्यावर आहे.
हेही वाचा :