जालना : गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं, निदर्शनं करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज अखेर यश आलं आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी करून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळं संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या घरच्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या पत्नीसह मुलीनंही शासनाचे आभार मानत मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. पप्पांनी दिलेला शब्द पाळला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत घरी येणार नाही, असं आश्वासन पप्पांनी दिलं होतं. त्यामुळं गेल्या सहा-सात महिन्यांपासून जरांगे घरी आलेले नाहीत, असं त्यांच्या मुलीनं म्हटलंय. आज आरक्षण घेऊन घरी आल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीनं दिली आहे.
जरांगे यांच्या मूळ गावी जल्लोष : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परतणार असल्याची घोषणा केली होती. ती घोषणा आज खरी ठरली. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी बीडमध्ये डीजे तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण करून पेढे देखील वाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गावातील महिलाही या आनंदोत्सवात सहभागी झाल्या.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीनं विजयोत्सव साजरा करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला. घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळं नाशिकच्या येवला येथील विंचूर चौफुलीवर देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. हातात भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अनेक जण मुख्यमंत्री झाले, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो सोडवला, अशी टिप्पणी करत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मराठा आंदोलकांनी आभार मानले.
हे वाचलंत का :