मुंबई Jayant Patil on vinesh phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटनं महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा 5-0 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतू विनेश फोगाट हिचं वजन वाढल्यामुळे महिलांच्या 50 किलो वजनी गटातून तिला अपात्र ठरविण्यात आलं. त्यामुळे देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मोदींना टोला लगावला आहे.
50-100 ग्रॅम वजन कसं वाढलं ? : "विनेश फोगाटचा परफॉर्मन्स गेले काही दिवस अतिशय उत्तम होता. मग अचानक काय झालं? 50-100 ग्रॅम वजन कसं वाढलं? सूत्र कुठून हलली कशी हलली? याविषयी शंका निर्माण होत आहे. विनेश फोगाटला सरकारनं दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक सर्वांना माहिती आहे. ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल, असं कोणाला वाटलं का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा अभ्यास आणि चौकशी करणे गरजेचं आहे. " विनेश फोगाटबाबत जे घडत आहे ते रोखायला हवं. "मोदी है तो मुमकिन हैं" असा म्हणत जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
सरकारचे काळे कारनामे समोर आणणार : जयंत पाटील म्हणाले की, "महायुती सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, राज्यातून बाहेर गेलेले उद्योगधंदे यामुळे महाराष्ट्र अधोगतीला गेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून जनजागरण करण्याच्या उद्देशानं जनतेसमोर जाऊन महाराष्ट्रातील युती सरकारचे काळे कारनामे 'शिवस्वराज्य यात्रे'च्या माध्यमातून समोर आणणार आहोत. पक्षाचे नवनिर्वाचित खासदार आणि आमदार या यात्रेत सहभागी होतील. शिवनेरी येथून 9 ऑगस्टला 'शिवस्वराज्य यात्रे'च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे," अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
'शिवस्वराज्य यात्रे'चं वेळापत्रक
11 ऑगस्ट- पुणे
12-13 ऑगस्ट -सोलापूर आणि उस्मानाबाद
14 ऑगस्ट -लातूर
15-16 ऑगस्ट -बीड
17 ऑगस्ट- जालना
सरकार शो बाजी करत आहे : उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून ते इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यावरून विरोधकांनी लाचारी पत्कारल्याचा आरोप केलाय. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीनंतर ते सगळ्यांना भेटत आहेत. त्यांचीदेखील भेट काही नेते घेत आहेत. ही लाचारी नाही. पावसाळ्यात पोलीस भरती घेऊन आम्ही भरती करत असल्याची 'शोबाजी' हे सरकार करत आहे. बांगलादेश मधील हिंचारामुळे भारत आणि बांगलादेश सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून आहेत त्यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा." असं जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
- जागा वाटपावर प्रतिक्रिया : जागा वाटपाच्या निर्णयाबाबत विचारलं असता ते म्हणाले, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दिल्लीत आहे. त्यामुळे पहिल्या बैठकीत जागा वाटपाबाबत निर्णय होणार नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या निर्णयाबाबत अजून काही बैठक होतील."
हेही वाचा
- बॅनरवरील धनुष्यबाण चिन्ह फाडल्यानं शिंदे गट आणि उबाठा गटात राडा : 'बॅनर फाडताना रंगेहात पकडलं' - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ : 'सह्याद्री'बाहेर घोषणाबाजी, वाचा काय आहे कारण? - Koli community meeting
- विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS