मुंबई Jayant Patil on MLC Election Results 2024 : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीनं 11 पैकी 9 जागा मिळवून महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. मी बेसावध राहिलो, परंतु नाराज नाही. मात्र, काँग्रेसच्या दुसऱ्या फेरीची मतं समान वाटली असती तर विजय निश्चित झाला असता अशा प्रकारची खंत शेकापाचे नेते तथा पराभूत उमेदवार जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. शरद पवार यांची तब्येत बरी नसल्यानं ते फोन घेत नाहीत, त्यांची भेट न घेता मी परत आल्याचं शेकापचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
सभागृह कोणी ताब्यात घ्यावे याविषयी जनतेनं विचार करावा : विधानपरिषद निवडणुकीत पराभवासंदर्भात काही कारणमीमांसा झाली का यावर बोलताना पाटील म्हणाले, "विधानपरिषद निवडणुकीत पहिल्यांदा घोडा बाजार झालेला आहे. पराभव हा पराभव आहे. त्यामुळं आम्ही त्यावर आत्मचिंतन करत आहे." तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचं राजकारण नव्हतं अशा प्रकारची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. माझ्या कार्यकाळात ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती. मात्र, दोन्ही सभागृह कोणी ताब्यात घ्यावी याविषयी जनतेनं आणि मतदारांनी विचार करावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
दोन दिवसांत निर्णयाविषयी बोलणार : महाविकास आघाडीकडून मदत झाली नाही का, यावर जयंत पाटील म्हणाले, "असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारा मतांवर उभा होतो. त्यात 1 मत फुटलं. त्यात आमची देखील मतं फुटली आहेत. पण अजून 4 मतं मिळाली असती तर मी सेकंड प्रेफरन्सनं 25 ते 30 मतं घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं काँग्रेसनं जर सेकंड प्रेफरन्सची मत समान वाटली असती किंवा एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता. याविषयी मी बोलेल परंतु त्यापूर्वी मला आत्मचिंतन आणि अभ्यास करावा लागेल." तसंच याविषयी मी दोन-चार दिवसांत बोलेल असं ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक देखील माझ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबले होते. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि शरद पवार यांच्यासोबत असणारा आहोत, यात कोणताही बदल होणार नाही, असं ते म्हणाले.
कॉंग्रेसबद्दल काही माहीत नाही : काँग्रेसची सात मतं फुटल्याच्या चर्चा आहेत. यावर जयंत पाटील म्हणाले, "मला याविषयी माहिती नाही. याचा अभ्यास देखील मी केलेला नाही. फुटलेल्या आमदारांसंदर्भात नाना पटोले यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी महाविकास आघाडी आणि शेकापचा उमेदवार आहे शरद पवार यांनी मला पुरस्कृत उमेदवार केलं होतं. चार आमदार गेले म्हणून पक्षाचं धोरण बदलत असतं असं आपल्यला वाटत नाही."
हेही वाचा :