मुंबई MP Unmesh Patil join Thackeray group : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तोंडावर असताना अनेक राजकीय घडामोडी वेगानं होताना दिसत आहेत. राजकीय पक्षांनी ज्या उमेदवारांचे पत्ते कापले, ते उमेदवार आता इतर पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या धडपडीत आहेत. जळगाव भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा सध्या सगळीकडं रंगली आहे. यंदा जळगावमधून भाजपानं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले उन्मेश पाटील भाजपाला रामराम करण्याची शक्यता आहे. पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आज त्यांनी मुंबईत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भेट घेतलीय. या भेटीनंतर उद्या ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय राऊतांची माझ्यासोबत मैत्री : यंदाच्या निवडणुकीत भाजपानं जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानं विद्यमान खासदार उन्मेश पाटील प्रचंड नाराज आहेत. त्यामुळं मागील अनेक दिवसांपासून पाटील, ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या. अशातच आज उन्मेश पाटील यांनी मुंबईत संजय राऊत, उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय. त्यामुळं ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. संजय राऊत यांच्या भेटीनंतर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले, ही मैत्रीपूर्ण भेट होती. याबाबत मी लवकरच सविस्तरपणे बोलणार आहे. आता याबाबत काही बोलणं उचित होणार नाही. आम्ही दोघांनी संसदेमध्ये एकत्र काम केलंय. राजकारणाच्या पलीकडं जाऊन मैत्री जपावी लागते. आमची नेहमी चर्चा होत असून प्रत्येक गोष्टीकडं राजकारण म्हणून बघू नका, असं उन्मेश पाटील म्हणाले.
गद्दरांसाठी दरवाजे बंद : संजय राऊत यांच्या भेटीनंतर उन्मेश पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत त्यांनी सविस्तर चर्चा केली असून याबाबत त्यांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. तसंच उन्मेश पाटील उद्या ठाकरे गटात प्रवेश करून शिवबंधन बांधणार हातात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उन्मेश पाटील यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भाजपावर त्यांची नाराजी आहे. यासाठी त्यांनी आमच्याकडं भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. उन्मेश पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत की नाही, याबाबत माझ्याकडं माहिती नाही. उन्मेश पाटलांप्रमाणे नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे त्यांची उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही. त्यामुळं ते शिवसेना शिंदे गटात नाराज आहेत. त्यामुळं हेमंत गोडसे यांना पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश देणार का?, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, गद्दारांसाठी आमचे दरवाजे बंद झाले आहेत.
संपदा पाटील उतरणार रिंगणात? : भारतीय जनता पक्षानं उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं त्यांना टक्कर देण्यासाठी उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीनं रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
मोठ्या मताधिक्यानं विजयी : भाजपानं 2019 च्या निवडणुकीत चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी त्याचबरोबर विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना जवळपास उमेदवारी घोषित केली होती. परंतु ऐन प्रसंगी त्यांना माघार घ्यायला लावून उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली गेली. उन्मेश पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता. उन्मेश पाटील यांना 7 लाख 13 हजार 874 मतं मिळाली होती. तर गुलाबराव देवकर यांना 3 लाख 02 हजार 257 मतं मिळाली होती. अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या उन्मेश पाटील यांचा पत्ता भाजपानं कट केल्यानं ते आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेश पाटील यांच्यामुळं पुन्हा ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा..
- 'आप'ला मोठा दिलासा! दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर - Granted Bail to AAP MP Sanjay Singh
- नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट झालेला दिसेल-संजय राऊत यांचा दावा - Sanjay Raut News
- महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, उदय सामंत घेणार गडकरी, फडणवीसांची भेट - Lok Sabha elections