मुंबई Seats Allocation Issue Mumbai : मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांसह धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २६ एप्रिल पासून सुरू होणार आहे; परंतु अद्यापही नाशिक, पालघर, ठाणे, मुंबईतील उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात काही ठिकाणी महाविकास आघाडी कडून तर काही ठिकाणी महायुतीकडून अद्याप उमेदवारांच्या घोषणा झालेल्या नाहीत. याबाबत दोन्ही बाजूंनी अनेक तारखा दिल्या असल्या तरी 'तारीख पे तारीख' असाच सिलसिला सुरू आहे. या कारणास्तव आता हा तिढा कधी सुटणार याकरिता दोन्ही बाजूंचे इच्छुक उमेदवार ताटकळत बसले आहेत.
उमेदवारांची धाकधूक वाढली : लोकसभेच्या रणधुमाळीत पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान २६ एप्रिल रोजी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे आणि चौथा टप्प्याचे मतदान १३ मे तसेच शेवटच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होत आहे. शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठीसुद्धा आता फारच कमी दिवसाचा अवधी उरला आहे. राज्यातील नाशिक, पालघर, ठाणे व मुंबईतील चार मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांना उमेदवार सापडत नाही आहेत. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी या मतदारसंघात निवडणुका होत असून निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ एप्रिल पासून सुरू होणार आहे. तरीही अद्याप उमेदवारांची घोषणा होत नसल्याने या जागांसाठी इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली असून ते हाय अलर्ट मोडवर आहेत.
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी : ठाण्यामध्ये उबाठा गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु महायुतीकडून इथे उमेदवाराची अद्याप चाचपणी सुरू आहे. तीच परिस्थिती नाशिक आणि पालघरमध्ये आहे. नाशिक मधून उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु तेथेही अद्याप महायुतीत उमेदवारीवरून पेच आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे त्यांच्या उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पालघरमध्ये उबाठा गटाने भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे अद्याप त्यांची उमेदवारी निश्चित होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
आपापसातच विरोध : मुंबईतील सहापैकी मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूने उमेदवार देण्यात आले आहेत; परंतु इतर चार मतदारसंघात अद्याप चित्र अस्पष्ट आहे. मुंबई दक्षिणमध्ये उबाठा गटाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे; परंतु महायुतीकडून अद्याप या मतदारसंघात उमेदवारांची वाणवा आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे. तर मुंबई दक्षिण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट ही जागा लढवण्यास इच्छुक असून येथून आताच काँग्रेस मधून त्यांच्या पक्षात प्रवेश गेलेले मिलिंद देवरा त्याचबरोबर त्यांच्या गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्यापैकी कुणा एकाचे नाव निश्चित होऊ शकते; मात्र भाजपा ही जागा शिंदे गटास सोडण्यास तयार आहे का? यावरही अद्याप मतभेद आहे.
संजय निरुपम शिंदे गटातून लढण्यास इच्छुक : अशीच परिस्थिती मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात आहे. उबाठा गटाकडून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर गजानन कीर्तिकर यांनी पुत्र विरुद्ध निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने या मतदारसंघातून शिंदे गट उमेदवाराच्या शोधात आहे. उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघातून सुरू आहे. तर काँग्रेस मधून बडतर्फ केलेले संजय निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करून या जागेवर निवडणूक लढू इच्छितात; परंतु रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या दोघांनाही पक्षांतर्गत फार मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
पुनम महाजन यांचा पत्ता कट.. पण नवीन उमेदवार सापडेना : मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघात भाजपाने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. भाजपासाठी ही हक्काची जागा आहे. पियुष गोयल यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीला तेवढ्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. इच्छा नसतानाही काँग्रेसला या जागेवर उमेदवार द्यावा लागणार आहे; परंतु या जागेवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार विनोद घोसाळकर किंवा त्यांची सून तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना केला जात आहे. घोसाळकर यासाठी तयार नाहीत; परंतु त्यांचे मन वळविण्यात काँग्रेस यशस्वी ठरते का? हे बघणं फार महत्त्वाचं आहे. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी अद्याप उमेदवार घोषित केला नाहीये. या मतदारसंघात भाजपाच्या पुनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. परंतु, यंदा पुनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपा दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव चर्चेत आहे. तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास पसंती दर्शवली आहे; मात्र त्यावरही अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही आहे. अशाप्रकारे मुंबईतील सहापैकी चार जागेवर अद्याप उमेदवारांचा तिढा कायम आहे.
उमेदवारांचे टेन्शन वाढले : उमेदवारांची घोषणा अद्याप होत नसल्या कारणाने इच्छुक उमेदवारांचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्व जागावाटपाचा तिढा एक ते दोन दिवसात सोडवला जाईल; परंतु हे एक ते दोन दिवस करता करता महिनाभराचा कालावधी लोटून गेला. तरी अद्याप उमेदवारांची घोषणा झाली नाही आहे. अशात आता निवडणूक प्रक्रियेला सामोरे जायला फारच कमी अवधी शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांसोबत कार्यकर्तेही कमालीचे धास्तावले आहेत. याबाबत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले आहेत की, आमचे उमेदवार नक्की झाले आहेत. आम्ही फक्त समोरून उमेदवार घोषित होण्याची वाट पाहत आहोत. समोरचा उमेदवार घोषित झाला की, लगेच आमचा उमेदवार घोषित होईल; परंतु याबाबत विनोद तावडे विसरले आहेत की ठाणे, नाशिक, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम या चार ठिकाणी महाविकास आघाडी कडून उमेदवार घोषित केले गेले आहेत. हे चारही उमेदवार उबाठा गटाचे आहेत; परंतु महायुती कडून अद्यापही उमेदवार घोषित झालेले नाहीत.
हेही वाचा :
- नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी; शाळा प्रशासनावर कारवाईचे आदेश, 'या' काँग्रेस नेत्यानं केली होती तक्रार - Lok Sabha Election 2024
- केवळ 22 अरबपतींना नाही, तर कोट्यवधी लोकांना लखपती करणार; राहुल गांधी यांची घोषणा - Lok Sabha Election 2024
- काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या 'त्या' विधानावरुन नवा वाद, काय आहे नेमकं प्रकरण? - Sam Pitroda On tax