मुंबई : 21 जुलैला सायंकाळी भारतीय नौदल जहाज ब्रह्मपुत्रा या बहु-भूमिका बजावणाऱ्या फ्रिगेट अशा जहाजाला आग लागली होती. नौदल डॉकयार्ड, मुंबई येथे रिफिट म्हणजेच दुरुस्त करत असताना ही ब्रम्हपुत्रा या भारतीय नौदलाच्या जहाजाला आग लागली होती. नौदल डॉकयार्ड, मुंबई आणि बंदरातील इतर जहाजांच्या सहाय्याने जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आज 22 जुलै 24 रोजी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीच्या घटनेत एक कनिष्ठ खलाशी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, दुपारच्या वेळी ब्रम्हपुत्रा जहाजाला एका बाजूला (बंदराच्या बाजूने) आणून ठेवण्यात आले आहे. सर्व प्रयत्न करूनही जहाज सरळ स्थितीत आणता आले नाही. जहाज तिच्या बर्थच्या एका बाजूला झुकले आहे. एक कनिष्ठ खलाशी वगळता सर्व कर्मचाऱ्यांची गणना करण्यात आली आहे. बेपत्ता खलाश्याचा शोध सुरू आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश भारतीय नौदलाला देण्यात आले आहेत.
या अगोदर देखील अलीकडेच म्हणजे १९ जुलै रोजी गोव्याच्या किनाऱ्याजवळ मर्चंट नेव्हीच्या जहाजाला भीषण आग लागली होती. त्यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जहाजावर 22 क्रू मेंबर होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. आग लागलेलं जहाज गुजरात राज्यामधील मुंद्रा येथून श्रीलंकेतील कोलंबो येथे जात होते. त्यावेळी ही घटना घडली होती. त्यात बेंझिन आणि सोडियम सायनेटसारखे धोकादायक माल ठेवण्यात आले होते. समुद्रात जहाजाला लागलेली ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी डॉरझियर विमानं देखील तैनात करण्यात आली होती.