नाशिक Nashik Swine Flu : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची कोणतीही माहिती आणि सूचना खासगी रुग्णालयांकडून महानगरपालिकेला दिली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता वैद्यकीय विभागानं शहरातील 650 खासगी रुग्णालयांना पत्र पाठवत, रोज स्वाइन फ्लू तसंच डेंगूच्या रुग्णांची माहिती कळवणे बंधनकारक केल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.
एकीकडं नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर असून दुसरीकडं डेंग्यू पाठोपाठ स्वाइन फ्लू ने डोकं वर काढलंय. सिन्नर तालुक्यातील एका महिलेचा स्वाइन फ्लू मुळं नाशिकच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर नाशिकमधील एक महिला आणि एका पुरुषाचे अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडं पाठवण्यात आल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आलं, त्यामुळं नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभाग खडबडून जागं झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर दाभाडी येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा 10 एप्रिल रोजी स्वाइन फ्लूचा अहवाल येऊनही संबंधित रुग्णालयांनी महानगरपालिका वैद्यकीय विभागाला कळवले नाही, डेंग्यू प्रमाणे स्वाइन फ्लू रुग्णांवर परस्पर उपचार केले जात असून त्यामुळं रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणं अवघड झालंय. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेनं 650 खासगी रुग्णालयांना पत्र पाठवून स्वाइन फ्लू रुग्णांची माहिती कळवण्याचे आदेश दिले आहे.
ही आहेत लक्षणं : स्वाइन फ्लू,डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या लक्षणांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, यात ताप ,सर्दी,थंडी,घसादुखी, अंगदुखी, खोकला,पोटदुखी, उलटी, जुलाब,मळमळ अशा लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळं स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावं, पौष्टिक आहार घ्या, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करा, पुरेशी झोप घ्या. तसंच रुग्णांनी मास्कचा वापर करावा, असं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं केलंय.
हेही वाचा -