मुंबई Mumbai High Tide : भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, आज (4 मे) सकाळी 11.30 वाजेपासून ते रविवारी (5 मे) रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झालं असून, मुंबईतील विविध समुद्र किनाऱ्यावर कुटुंबासह दाखल होणाऱ्या पर्यटकांना सहकार्य करण्याचं आवाहन पालिकेनं केलंय.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेला इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसंच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या 36 तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं, तसंच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी, सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलंय.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश दिलेत. तसंच महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीनं नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता, अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळं किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असं देखील आवाहनही पालिकेनं केलंय.
किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळं एकमेकांना धडकून बोटींचं नुकसान होणार नाही. या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसंच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक आणि किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावं, समुद्रात शिरू नये. तसंच समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसंच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावं, असंही पालिकेनं म्हटलंय.
हेही वाचा -
- ऐतिहासिक बाणगंगा तलाव ठरणार मुंबईचं मुख्य आकर्षण, महानगरपालिका प्रशासनाचा हा आहे 'ड्रीम प्रोजेक्ट' - Historical Banganga Lake
- मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई मेट्रोचा पुढाकार; प्रवाशांसाठी 'ही' खास ऑफर - lok sabha election 2024
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाने मुंबईतील समुद्र खवळला.. लाटांनी घेतले रौद्ररुप