छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात वेगळी समीकरणं पाहायला मिळणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून राजकीय गाठीभेटी व दौरेही सुरू झाले आहेत. दरम्यान, एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. या भेटीमुळं राज्यातील मराठा आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवसांत आमची रणनीती स्पष्ट : मंगळवारी दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना सुरुवात झाली. त्यात संध्याकाळी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अंतरवाली सराटी येथं जाऊन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आगामी निवडणुका लक्षात घेता, ही भेट झाल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून, सरकारनं फक्त दिशाभूल केलीय. तर मुस्लिम समाजाला देखील आरक्षणाची गरज असल्यानं आम्ही चर्चा करत असून पुढील दोन दिवसांत आमची रणनीती स्पष्ट करू. राजकारणात वेळेनुसार पत्ते उघडावे लागतात आणि आम्ही ते उघडू, असा सूचक इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
महाविकास आघाडीनं सोबत घेतलं नाही : मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना भाजपावर सडाडून टीका केलीय. निवडणुकीत भाजपाला धडा शिकवा, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय. इम्तियाज जलील यांनी देखील भाजपावर आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. "महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे मोठे राजकीय पक्ष फक्त बोलतात आणि काही करण्याची वेळ आली की मागे सरकतात, अशी टीका त्यांनी केली. मुस्लिम समाज समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि मराठा समाज देखील आरक्षणासाठी आपला लढा लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना आरक्षणाचा मुद्दा दिल्लीपर्यंत येऊ देऊ नका, असं देखील सांगितलं होतं. त्यामुळं भाजपा हा समाजासमाजात भांडण लावण्याचं काम करत आहे. त्यामुळंच आम्ही एक वेगळा पर्याय म्हणून मतदारांसमोर येण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच त्याबाबत माहिती देऊ," असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
उदय सामंत यांनी देखील घेतली भेट : एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी देखील मंगळवारी सकाळी आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं राजकीय समीकरणात मोठे बदल पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा किती परिणाम होतो, हे अद्याप स्पष्ट नसलं तरी, जरांगे पाटील यांची भेट घेऊन नुकसान टाळण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा