मुंबई Mumbai Crime News: गँगस्टर इम्रान कालियाच्या अटकेनंतर तो दाऊदचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकरच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कासकरचा मोबाइलवरून त्याचा आंतरराष्ट्रीय क्रमांकही जप्त केला आहे. मीरा रोडच्या महिलेकडून पैसे उकळल्याप्रकरणी कालियाला अटक करण्यात आली होती. शनिवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कालियाला न्यायालयात हजर केले असता त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खंडणी विरोधी पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कालियाच्या फोनमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रमांकही सापडले आहेत. त्याबाबात गुन्हे शाखा तपास करत आहे." पोलिसांनी त्यांच्या रिमांडमध्ये म्हटले आहे की, "आरोपी इम्रान कालियानं दाऊद इब्राहिमसोबत त्याच्या वडिलांचा फोटो खंडणीसाठी वापरला होता. आरोपीने आणखी किती लोकांना धमकावले हे शोधण्यासाठी तपास केला जाणार आहे."
१० लाख रुपये जप्त: पोलिसांनी इम्रान कालियाकडून 46 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये जप्त केले आहेत. आणखी काही रक्कम जप्त करायची आहे. मीरा रोड येथील रहिवासी असलेली ४६ वर्षीय महिला दुबईमध्ये मार्केटिंग कर्मचारी म्हणून काम करत असताना इम्राननं तिला चांगल्या नफ्याचं आश्वासन दिलं. सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. महिलेने मीरा रोड येथील घराच्या विक्रीतून 46 लाख रुपये गुंतवले. मात्र इम्रान कालियानं नफ्याची रक्कम दिली नाही.
इब्राहिमचा नातेवाईक सांगून उकळले १६ लाख: इम्रान कालियानं दाऊदच्या नावाने महिलेला धमकावले. स्वत:ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि नातेवाईक असल्याचे सांगून 16 लाख रुपये उकळले. दुबईत राहणाऱ्या मुलांनाही जीवे मारण्याची धमकी इम्रानने दिली. महिलेच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच खंडणीविरोधी पथकाने इम्रान कालियाला नागपाडा येथून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
हेही वाचा