अमरावती Important Role of Bats in Environment : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात मोठ्या संख्येनं वटवाघूळ लटकलेले दिसताय. यांना स्थानिक भाषेत उलटा पक्षी म्हटलं जात. या उलट्या पक्षांची संख्या सर्वाधिक घाटांग ते चिखलदरा मार्गावर असणाऱ्या सलोना या गावालगत जंगलात पहायला मिळतेय. निलगिरीच्या असंख्य झाडांवर या उलट्या पक्षांनी डेरा टाकल्याचं पहायला मिळतंय. एकाच ठिकाणी 500 पेक्षा अधिक संख्येने सलोना गावालगत उलटा पक्षी निलगिरीच्या झाडाला लटकेले आहेत. 'ईटीव्ही भारत'नं या परिसरातील या उलट्या पक्षाच्या वास्तव्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा या भागात वटवाघूळ पक्षाला उलटा पक्षी स्थानिक नागरिक उलाटा पक्षी म्हणत असल्याची माहिती समोर आलीय.
सलोना लगत असंख्य उलटा पक्षी : सलोना या गावापासून अवघ्या काही अंतरावर घटांग मार्गावरील जंगलामध्ये मोठ्या संख्येनं निलगिरीच्या झाडांवर उलटा पक्षी लटकलेले दिसतात. हे उलटा पक्षी सायंकाळी अंधार पडताच लगतच्या तलावावर पाणी पिण्यासाठी एकत्र येतात. पाणी पिल्यावर ते आकाशात उंच भरारी घेत, परतवाडा, धामणगाव गढी या गावांच्या दिशेने झेप घेतात.परतवाडा शहरालगत असणाऱ्या संत्री, केळीच्या बागेत हे उलटा पक्षी रात्रभर मनसोक्त फळावर ताव मारतात. त्यानंतर ते पुन्हा पहाटे सलोना निलगिरीच्या झाडांवर येऊन उलटे लटकतात, अशी माहिती सलोना येथील रहिवासी कालू चिमटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. मी माझ्या जन्मापासूनच या निलगिरीच्या झाडावर उलटा पक्षी पाहतोय. दिवसभर अगदी शांतपणे हे पक्षी निलगिरीच्या झाडांवर उलटे लटकले असतात. या ठिकाणी माणसं आल्यास हे पक्षी जोरात ओरडतात, अशी माहिती देखील कालू चिमोटे यांनी दिली.
असंं आहे उलटा पक्षांचं वैशिष्ट्य : मेळघाटातील उलटा पक्षी अर्थात वटवाघूळ हा दूरपर्यंत उडू शकणारा सस्तन प्राणी आहे. वटवाघूळसंदर्भात अनेक अंधश्रद्धा पसरविण्यात आल्या आहेत. वटवाघूळाचे मागचे पाय अतिशय लहान, अविकसित असल्यामुळं ते धावू शकत नाहीत. त्यामुळं इतर पक्षांप्रमाणे वटवाघूळ थेट जमिनीवरून उडू शकत नाही. मात्र, झाडावर उलटे लटकून राहिल्यामुळं त्यांना उड्डाण घेणं सहज शक्य होतं. वटवाघूळ रात्रीला कीटक खात असल्यामुळं निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कीटक नियंत्रण, वनस्पतींचे परागण आणि बियाणे विखुरण्यात वटवाघूळं महत्त्वाची भूमीका बजावताय. त्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होते.
ऋतूनुसार निवडतात झाडं : मेळघाटात सलोना गावाजवळ मोठ्या संख्येनं वटवाघूळ आहेत. हा परिसर रस्त्याला लागून असल्यामुळं या ठिकाणी वटवाघूळ असल्याचं आपल्याला लक्षात येतं. खरंतर मेळघाटातील दाट जंगलातमध्ये देखील निलगिरीच्या झाडांवर मोठ्या संख्येनं वटवाघूळांचं वास्तव्य आहे. उन्हाळ्यात निलगिरीच्या झाडावर दिसणारे हे वटवाघूळ पावसाळा आला, की जवळचं असलेल्या वडाच्या झाडांवर उलटे लटकलेले दिसतात . वटवाघूळ हे ऋतूनुसार निलगिरी, वड या झाडांची निवड करतात अशी माहिती पक्षी, निसर्ग अभ्यासक डॉ. जयंत वडककर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. मेळघाटात सलोनासोबतच सेमाड या ठिकाणी निलगिरीच्या झाडावर वटवाघूळ आहेत. मेळघाटच्या जंगलात वटवाघूळांची संख्या मोठी आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं वटवाघुळ अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अनेक भागात वटवाघूळाबाबत अंधश्रद्धा आहेत. मेळघाटात अनेक भागात आदिवासी मात्र वटवाघूळाला शुभ मानतात . त्यामुळं वटवाघूळासंदर्भात शुभ-अशुभ अफवा असल्याचं देखील डॉ. जयंत वडकर म्हणाले.
हे वाचलंत का :