मुंबई Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागानं मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (IMD Issued Orange Alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आज घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे. भारतीय हवामान विभागानं आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD has issued an orange alert for Mumbai, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Pune, Satara, Amravati, Bhandara, Gondia, and Chandrapur for tomorrow pic.twitter.com/nrlAZ8DwD1
— ANI (@ANI) August 23, 2024
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी सकाळी हजेरी लावली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पावसानं उसंत घेतली होती. आता मुंबईत पाऊस पुन्हा सक्रीय झालाय. शनिवारी सकाळीपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
लोकल, रस्ते वाहतूक मंदावली : मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरूय. या पावसामुळं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली. त्यामुळं रस्ते वाहतूक मंदावली आहे. पावसाचा फटका हा लोकल रेल्वेलाही बसलाय.
पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा : गेल्या दोन दिवसात पालघर आणि विरार पट्ट्यात पावसानं जोर धरला. राज्याच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचा महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी असा परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. शनिवार आणि सोमवारी रायगड जिल्ह्यात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात घाट परिसरात आजपासून सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता : उत्तर महाराष्ट्राचा विचार करता रविवारी नाशिक जिल्ह्यात तर नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा -