मुंबई Sanjay Shirsat : मागील काही दिवसांपासून थंडावलेल्या मनसेच्या महायुतीतील समावेशाच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरलय ते म्हणजे शिवसेना-शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट. संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं? या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात होतं; मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि भविष्यातील घडामोडींवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरेंशी आमचे जुने संबंध : राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांची महायुती सोबतची बैठक यशस्वी झाली अशा चर्चा सुरू झाल्या. लवकरच महायुती सभांमध्ये राज ठाकरे देखील दिसतील असं बोललं जाऊ लागलं. मात्र, कालांतराने या चर्चा थंडावल्या. मात्र आज संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीबाबत संजय शिरसाट यांनी सांगितलं की, "राज ठाकरे आणि माझे जुने संबंध आहेत. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा ते अनेकदा मराठवाड्यात यायचे. तेव्हापासूनचे आमचे स्नेह आहेत. माझी देखील अनेक दिवसांपासूनची राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा होती. आज तो योग आला. ही वैयक्तिक भेट होती. राजकीय चर्चा झाल्या. मात्र, सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कोणतीही चर्चा झालेली नाही.
तर ठाकरेंसाठी रेड कार्पेट टाकू : पत्रकारांनी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता संजय शिरसाट म्हणाले की, "माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे की राज ठाकरे यांनी महायुतीचा भाग व्हावं. त्याचा आमच्या युतीला फायदाच होईल. हे माझं वैयक्तिक मत आहे. राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणारा मी असेल."
मनसेच्या पाडवा मेळाव्याचा टिझर रिलीज : 9 एप्रिलला दादरच्या शिवाजी पार्क येथे मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मनसे तयारी लागली असून, या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शुक्रवारी मनसेने पाडवा मेळाव्याचा टिझर रिलीज केला. यामध्ये राज ठाकरे यांनी 'सध्या राजकारणात नेमकं काय घडतंय आणि काय घडलंय हे मला तुमच्याशी प्रत्यक्ष सांगायचं आहे यासाठी शिवतीर्थावर या,' असं आवाहन केलय. शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे महायुतीतील प्रवेशाबाबत काही खुलासे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधीच शिवसेना शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं शिरसाट यांनी राज ठाकरे यांना नेमका कोणता मेसेज दिला?' अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा :
- तालिबानपेक्षाही भयंकर! पंजाबमध्ये महिलेला विवस्त्र करत काढली धिंड, काय आहे संपूर्ण प्रकरण - NAKED PARADE women punjab
- शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकर गरजले - Sharad Pawar
- दुर्मिळ 'सेरेब्रल पाल्सी' आजारानं ग्रस्त रुद्रनं जिंकलं राष्ट्रीय सुवर्ण पदक; कसा आहे रुद्रचा प्रेरणादायी प्रवास? - Cerebral Palsy