दौंड (पुणे) Ganeshwari in Bhuleshwar Temple : अखंड महाराष्ट्रातील जागृत देवस्थान पुणे जिल्ह्यात प्राचीन कलेचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात श्री गणेशाचे विविध रुपात दर्शन होते. भुलेश्वर मंदिरात स्त्री रुपातील गणेशाचे अर्थात गणेश्वरीचे देखील दर्शन होते. दगडात कोरलेला स्त्री रुपातील गणेश्वरी लक्ष वेधून घेते.
या विविध रुपातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भुलेश्वर मंदिरास भेट देतात. मंदिरात माडीवर खांबावर एक गणेशमूर्ती दिसते. याचे वेगळेपण म्हणजे योगासन केल्याप्रमाणे डाव्या पायावर मूर्ती असून उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्या वर टेकवला आहे व दोन्ही हाताने उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. याला शक्ती गणपती किंवा गणेश्वरी असंही म्हणतात.
तसंच भुलेश्वर गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन करुन बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाकडे जाताना दक्षिण दरवाज्याजवळ एका खांबावर एक गणेश मूर्ती दोन्ही हात तसंच पाठ छताला लावलेली दिसते. या मूर्तीकडे पाहिल्यावर जणू काही या गणेशाने संपूर्ण मंदिराचा भार आपल्या पाठीवर संभाळला आहे असं प्रतीत होतं. पुढे प्रदक्षिणा मार्गावर मकर तोरणे दिसतात. यामध्ये सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. यामध्ये गणेशाचे स्त्रीरुप सुध्दा पहावयास मिळते. ही मूर्ती पद्मासन घालून आसनस्थ व चतुर्भुज आहे तर खाली मूषक वाहन आहे. शेजारीच ब्रम्हा, विष्णू, महादेव, कार्तिकेय वगैरे अशा विविध देवतांच्या सुध्दा स्त्रीरुपातील मूर्ती आढळतात.
देवींच्या विविध नावांमध्ये विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशी नावे आढळतात. शिल्परत्न ग्रंथातही अशा स्त्री रुपातील गणेशाचा उल्लेख आहे. गणेशानी किंवा वैनायकी हे प्राचीन काळातील प्रचलित नाव आहे. श्रीगणेशाला गजमुखी युवतीच्या रुपात शिल्पित केल्याचे उल्लेख आढळतात. स्कंद पुराणातही ६४ योगिनींच्या नावांमध्ये स्त्री रुपातील गणेश येतो. तर मत्स्य पुराणात दोनशे देवींच्या नामावलीत वैनायकीचा उल्लेख येतो. श्री देवी सहस्रनाम स्तोत्रामध्ये या देवतेस गणेशानी, वैनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी या नावांनी संबोधले आहे. स्त्री रूपातील गणपतीला गणेशानी तसंच वैनायकी अशी नावं दिलेलीही दिसून येतात. गणेशानी आणि वैनायकीचे उल्लेख ललितास्तोत्रामध्येही आढळतात.
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावातून माळशिरस(पुरंदर) येथे गेलो असता त्याठिकाणी श्री. भुलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. बाराव्या शतकातील हे मंदिर आहे. येथे भगवान श्री शंकराचीही स्त्री रूपातील शिल्प आढळतात.या सर्व मूर्तीचा कालखंड हा तेराव्या शतकाचा (इसवी सन १२३०) आहे.सद्यस्थितीत या भुलेश्वर मंदिर जतन व देखभाल करण्याचे काम पुरातत्व विभाग करत आहे.