नाशिक Snake Bite Woman : पत्नीला सर्पदंश झाल्यानं बेशुद्ध झालेल्या पत्नीला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढत पतीनं रुग्णालय गाठलं. वेळेवर उपचार मिळाल्यानं पत्नीचे प्राण वाचले आहे. संततधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावत पत्नीला वेळेवर रुग्णालयात पोहोचवल्यानं पतीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे घटना : नाशिक जिल्ह्यातील घोटी तालुक्यातील टाकेदपासून तीन किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत सोनाशी गावातील चिखलदरा वस्तीमध्ये आंबेकर कुटुंब राहते. पत्नी अश्विनी आंबेकर हिला 28 जुलैला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सर्पसंश झाल्यानं तिची प्रकृती घालवत होती. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना चिखलदरा भागातील सर्वत्र नदी नाल्यांना पूर आला होता. त्यामुळं पुराच्या पाण्यातून पलीकडं रस्ता ओलांडणं कठीण झालं होतं. अशा परिस्थिती अश्विनी यांच्या शरीरात विष पसरल्यानं त्या बेशुद्ध पडल्या. अशात पती सुनील यांनी प्रसंगावधान दाखवत पत्नीला खांद्यावर घेतलं आणि पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडत सोनाशी गाव गाठलं. तेथून तात्काळ गाडीतून पत्नीला आठ वाजता घोटी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्यामुळं दुपारी अश्विनी या शुद्धीवर आल्या.
पत्नीला सर्पदंश झाल्यानं ती बेशुद्ध झाली होती. अशात रुग्णालयात जातांना नदीला पूर आल्यामुळं पत्नीला खांद्यावर घेऊन कमरे एवढ्या ओहोळातील पुराच्या वाहत्या पाण्यातून रस्ता ओलांडून घोटी ग्रामीण रुग्णालय गाठलं. हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. पत्नीची प्रकृती खालावत असल्यानं माझ्यासाठी एक एक सेकंद महत्त्वाचा होता. नशिबाची आणि डॉक्टरांची साथ मिळली म्हणून आज माझी पत्नी वाचली. आमच्या गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालीय. तेथून वाहने तर सोडा पण चालू पण शकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून नदी ओलांडण्यासाठी पूल व्हावा अशी मागणी केली परंतु, पण ती अद्याप पूर्ण झाली नाही. - सुनिल आंबेकर
वेळेवर उपचार मिळाल्याने जीव वाचू शकलो : सुनीलने पत्नी अश्विनीचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत, पत्नीला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यानं तत्काळ उपचार करता आले. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा उपलब्ध असल्यामुळं उपचार करणं सुलभ झाल्याचं घोटी ग्रामीण रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. राहुल वाघ यांनी यांनी सांगितलं.
हेही वाचा -