अकोला Honor Killing Akola : मुलानं मागासवर्गीय मुलीवर प्रेम करुन तिच्यासोबत लग्नाचा घाट घातल्यानं वडिलानं मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. संदीप नागोराव गावंडे असं खून करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. तर नागोराव कर्णाजी गावंडे आणि प्रदीप नागोराव गावंडे अशी मारेकऱ्यांची नावं आहेत. बापलेकानं खून करुन ते बाहेरगावी गेले होते, दुसऱ्या दिवशी घरी येऊन मुलाचा खून झाल्याचा बनाव त्यांनी केला होता. मात्र पोलीस तपासात बाप आणि मुलानं मिळून हा खून केल्याचं उघड झालं.
मुलाचा खून करुन गेले बाहेरगावी : टिटवा गावातील गावंडे कुटुंब मुलाला घरी ठेवून बाहेरगावी गेले होते. हे कुटुंब शुक्रवारी दुपारी घरी परत आले असता, त्यांना संदीप गावंडे याचा राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. त्यांनी एकच टाहो फोडला. याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आल्यानं पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी पंचनामा करुन तपास केल्यानंतर या खुनाचं गूढ उकलण्यात आलं.
दलित मुलीवर होतं संदीपचं प्रेम : नागोराव गावंडे यांचा मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. दरम्यान संदीपचं गावातील एका मागासवर्गीय कुटुंबातील मुलीशी प्रेम होतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय केला. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याच्यावरुन अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. त्यामुळं दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी यावर कायमचा तोडगा करण्याचा निश्चय केला. त्यांनी मोठा मुलगा प्रदीपच्या मदतीनं संदीपचा खून केला.
असा काढला संदीपचा काटा : मागासवर्गीय मुलीवर प्रेम का केलं, अन् लग्नही करतो, असा सवाल वडील नागोराव यांनी करुन मृत संदीपसोबत वाद घातला. या दरम्यान त्याच्याच भावानं आणि वडिलानं घरातच संदीपचा गळा आवळून त्याचा खून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यानंतर संदीपचे हात पाय वायरनं बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले. ते घरी परतले असता, आपल्या मुलाला कोणीतरी मारलं असा बनाव रचला. पण पोलिसांच्या तपासात सर्व बिंग फुटलं. सद्यस्थितीत मारेकरी वडील आणि मोठा मुलगा प्रदीप पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :