सिंधुदुर्ग Holi Shimogotsav : सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते. होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ही आगळीवेगळी पंरपरा पूर्वीपासून सुरू आहे. यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सनामटेंबवाडीतील तानाजी ऊर्फ न्हानू यशवंत सनाम यांच्या घराजवळच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली होती. ''हर हर महादेव" च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
फणसाच्या झाडाला मानतात दैवत : तळकोकणात सण म्हटल की वेगवेगळ्या रुढी परंपरा पाहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशी पासून शिमगोत्सव सुरू होतो. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगेली या गावात सुरू आहे. या गावात ग्रामस्थ एकत्र येत देव म्हणून फणसाचं झाड ठरवतात. मग ते झाडं तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधिवत प्राणप्रतिष्ठापणा करुन मंदीरात ठेवलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे. हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात आहे. या गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं.
आठ दिवस सुरू असतो उत्सव : कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पाहायचा असेल तर सांगेलीत गेलं पाहिजे. सांगेली गावात होळीऐवजी गिरोबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गिरोबाचं पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होतं. यामुळं सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानते. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी आहे. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे. असा गाववासीयांचा दृढ विश्वास आहे. गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळं फणसाचं झाड कुठंही दिसलं तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसं त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवलं जात नाही. राज्यात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. सांगेलीत होळी सणाला सुरुवात होते ती महाशिवरात्रीपासून आणि गिरोबाचा आठ दिवस उत्सव सुरू असतो. या उत्सवात जिल्हावासीयांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मध्यरात्री लाखोंच्या उपस्थितीत गिरोबाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
हेही वाचा :