मुंबई High Court Reject Bail : नांदेड जिल्ह्यातील एका गावात वारांगणेच्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना 2018 मध्ये घडली होती. त्याबाबत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयानं आरोपींना शिक्षा ठोठावली. या तिन्ही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायमूर्ती अभय वाघवासे यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 20 जानेवारी रोजी न्यायालयानं याबाबतचे आदेशपत्र जारी केलं.
मध्यरात्री चाकूच्या धाकावर केला बलात्कार : अल्पवयीन मुलगी आणि तिची आई 26 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांच्या घरात झोपलेले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास तीन आरोपींनी जबरदस्तीनं दरवाजा ढकलून आईच्या गळ्याला चाकू लावून धमकावर या नराधमांनी आळीपाळीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. आरोपींच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळावा, यासाठी जिल्हा न्यायालयाच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायमूर्ती अभय वाघवासे यांनी "नराधम आरोपींना उपलब्ध तथ्याच्या आधारे कोणतीही दया दाखवता येत नाही," असं म्हणत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
पीडितेची आई वारांगणा असल्यानं संशय : आरोपींच्या वतीनं वकील ए एम गायकवाड यांनी न्यायालयात मुद्दा उपस्थित केला, की "तक्रारदार ही पोक्सो कायद्यांतर्गत व्याख्येनुसार पीडित बालक आहे, हे सिद्ध झालं पाहिजे. कारण पीडितेचं वय 16 असल्याचं म्हटलंय. परंतु त्याच्या समर्थनार्थ जोडलेले पुरावे संशयास्पद आहे. त्यामुळेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. परंतु बालिका सोळा वर्षाच्या आतील आहे. याबाबत त्याचा ठोस पुरावा नाही. तसेच घटना घडली मध्यरात्री एक वाजता आणि त्याच्यानंतर पाच सहा तासानंतर तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेची आई वारांगणा आहे. त्यामुळेच यामध्ये संशयाला जागा आहे. अल्पवयीन बालिकेच्या शरीरावर कुठंही जखमा कशा नाहीत."
वारांगणा असली तरी आई आपल्या मुलीला बळी कशी बनवेल : सरकारी वकील एस एम गणाचारी यांनी बाजू मांडली, की "मध्यरात्री एक वाजता नराधम सदर महिलेच्या घरामध्ये घुसले. तिच्या गळ्याला चाकू लावला. तिला एका खोलीमध्ये नेलं आणि दोघांनी आळीपाळीनं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. नंतर तिसऱ्यानं पुन्हा येऊन बलात्कार केला. त्यामुळं त्यांचा दावा अत्यंत खोटा आहे. अल्पवयीन मुलीची आई वारांगणा आहे, म्हणून ही वस्तुस्थिती खोटी कशी असू शकते. आई जरी व्यवसाय करत असली, तरी ती आई आहे. मुलीला बळी कशी देईल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे देखील लैंगिक हल्ला झाल्याचं स्पष्ट होते."
नराधमांना न्यायालयाचा दणका : सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अभय एस वाघवासे यांनी निर्णय दिला, की "उपलब्ध तथ्य आणि वस्तुस्थिती पाहता आरोपींचा जामीन अर्ज तथ्यावर टिकत नाही. बलात्कार केल्याचं सत्य बदलत नाही. उपलब्ध पुरावे अपीलकर्त्या आरोपींच्या विरुद्ध आहेत. त्यामुळेच आरोपींना जामीन नाकारला जात आहे."