कोल्हापूर : कागल येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नवीन सीमा तपासणी नाका आजपासून (10 डिसेंबर) सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी भेट दिल्यानंतर हा सीमा तपासणी नका सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अवजड वाहनधारकांची संघटना असलेल्या लॉरी असोसिएशनचा या सीमा तपासणी नाक्याला विरोध असल्यानं पोलीस बंदोबस्तात हा नाका सुरू करण्यात आला. या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असल्यानं 12 डिसेंबरनंतर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सीमा तपासणी नाक्याला विरोध : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल जवळील सीमा तपासणी नका अनेक कारणानं वादाचा केंद्रबिंदू ठरला. नवीन सीमा तपासणी नाक्याच्या बांधकामाची रक्कम न मिळाल्यानं या प्रकल्पाचे ठेकेदार थेट न्यायालयात गेले होते. सीमा तपासणी नाका सुरू होऊ नये, यासाठी या ठेकेदारांनी न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. मात्र, अदानी समूहाकडून निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून सीमा तपासणी नाका चालू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर आजपासून हा नाका सुरू झाला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य लॉरी असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनं मालवाहतुक करणाऱ्या मालवाहू गाड्यांच्या वजनात तफावत आणि वाढीवकर आकारणी होणार असल्यानं याला विरोध दर्शवला आहे.
जमावबंदीचे आदेश लागू : सोमवारी (9 डिसेंबर) लॉरी असोसिएशन मालवाहतूक वाहनांसह सीमा तपासणी नाक्यावर मोर्चा काढणार होते. मात्र, उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या परिसरात 12 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. 12 डिसेंबरनंतर हा नाका सुरू होऊ नये, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिला.
सीमा तपासणी नाक्याला विरोध का? : परराज्यातून येणाऱ्या मालवाहू वाहनाची या ठिकाणी तपासणी केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्यास 26 हजारांच्या दंडाचा फटका मालवाहतूक करणाऱ्या मालकाला भरावा लागणार. तर क्षमतेपेक्षा कमी माल वाहनामध्ये असल्यास 268 रुपयांची कर पावती करावी लागणार आहे. तसंच या ठिकाणी मालवाहतूक करणाऱ्या चालकांच्या सुविधेची वानवा आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य लॉरी ऑपरेटर असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन यांनी सीमा तपासणी नाक्याला कडाडून विरोध केला आहे.
हेही वाचा