कोल्हापूर Reda Worth Ten Crores : पंधरा ते वीस किलोंचा रोजचा पशू आहार, वीस लिटर दूध, पाच किलो फळे सभोवताली वातानुकूलित वातावरण आणि रोजचा टीव्ही पाहण्याचा छंद ही हरियाणातील 'गोलू 2' रेड्याची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापुरातील भीमा पशुपक्षी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या गोलू 2 रेड्याचा दररोजचा खुराक सुमारे पाच ते दहा हजारांच्या घरात आहे. तसंच देखण्या आणि रुबाबदार गोलू 2 रेड्यानं देशभरातील अनेक नामांकित स्पर्धांमध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.
हत्तीनंतर सर्वात मोठा आणि लांब प्राणी? : खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून गेली 15 वर्षांपासून कोल्हापुरात भीमा कृषी पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील 26 ते 29 जानेवारी दरम्यान या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात तब्बल 10 कोटी रूपयांच्या गोलू 2 या रेड्याची सर्वाधिक चर्चा झाली. तसंच हा रेडा पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत होते. दरम्यान, 'गोलू 2' हा हत्तीनंतर सर्वात मोठा आणि लांब प्राणी असल्याचा दावा या रेड्याच्या मालकानं केला आहे.
एसी अन् टीव्हीची व्यवस्था : गोलू 2 रेड्यानं आतापर्यंत अनेक पारितोषिकं जिंकली असून याला सांभाळणं वाटतं तेवढे सोप्प नाहीय. गोलू 2 चे मालक नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलू 2 ला दररोज 15 ते 20 किलो पशु आहार, 5 किलो फळ आणि 20 लिटर दूध लागतं. तसंच त्याच्यासाठी स्वतंत्र आंघोळीची व्यवस्था, 24 तास एसी आणि टीव्हीची देखील सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोलू रोज टीव्हीदेखील पाहतो.
सर्वात कमी उंचीची गाय- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात असलेली सर्वात कमी उंचीची 'पुंगनूर' प्रजातीची गायदेखील या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. तसंच शंभर किलो वजनाचा वेताळ बोकड, फायटर कोंबडा, 95 किलो वजनाचा 1 वर्ष 26 दिवसांचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस, रावण नावाचा 6 फूट 2 इंच लाल कंधारी वळू, नांदेड येथील खिल्लार बैल, साडेचार फूट लांब शिंगे असलेली पंढरपुरी म्हैस आदी प्राणी या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
हेही वाचा -