मुंबई : दादर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनानं दिलेल्या कारवाईच्या नोटीसला स्थगिती देण्यात आल्याची माहिती माजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. याबाबत रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत तसंच केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर या प्रकरणी देण्यात आलेल्या प्रस्तावित कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. मंदिराच्या विषयावर राजकारण करणाऱ्यांबाबत आपण काही बोलू इच्छित नाही, असेही ते म्हणाले.
रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानुसार पाडकामाला स्थगिती दिली असल्यानं आता कोणीही महाआरती करायचा प्रश्न उद्भवत नाही. हे मंदिर इथेच राहणार असून मंदिर कुठेही जाणार नाही. त्यामुळे आता यावर राजकारण करू नये, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. तरीही आदित्य ठाकरे यांनी रात्री उशिरा या मंदिरात येऊन महाआरती केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई, आमदार सचिन अहिर व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. हे मंदिर जुनं आहे, त्याला कोणीही पाडणार नाही. सर्व मंदिरं वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आहे, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.
आमदार रवी राणाची मंदिराला भेट - आमदार रवी राणा यांनी शनिवारी दुपारी दादर येथील हनुमान मंदिराला भेट दिली दर्शन घेतलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हिंदुत्व वाचवणारे, हिंदुत्व सशक्त करणारे सरकार आहे, त्यामुळे मंदिरे तोडली जाणार नाहीत तर मंदिरे बनवली जातील, असं राणा म्हणाले. रेल्वेचे कायदे ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे ते नोटीस पाठवत असतात, मात्र या हनुमान मंदिराला काहीही धोका उद्भवणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालीसा पठण करायला विरोध केला होता. एका महिला खासदार तसंच आमदाराला तुरुंगात पाठवून आपलं हिंदुत्वविरोधी धोरण दाखवून दिलं होतं. विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या पराभवाच्या फटक्यामुळे त्यांना आता हिंदुत्वाची आठवण आली आहे, असं राणा म्हणाले.
यापूर्वीही आली होती नोटीस - या हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी मंदिराला आलेली नोटीस, त्या नोटीसला देण्यात आलेलं स्थगितीचं पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं. लोढांसोबत चर्चा झाली नाही. लोढा आले तेव्हा त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा ताफा असल्यानं गर्दीत आत येऊ शकले नसल्याचं ते म्हणाले. लोढांनी एक हस्तलिखित पत्र दाखवलं त्यावर प्रस्तावित कारवाईस स्थगिती देत असल्याचं नमूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. चार वर्षांपूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. मंदिराला पाडकामाची नोटीस आली होती त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा हाच प्रकार घडला आहे. याबाबत कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा कारखानीस यांनी व्यक्त केली.
हेही वाचा..