मुंबई Global fintech fest : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी मुंबई, महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये त्यांनी संबोधित केलं. या कार्यक्रमाला रिझर्व बँक ऑफ (RBI) इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI ) प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यासह देशातील सर्वोच्च नियामकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुद्रा योजनेअंतर्गत २७ लाख कोटी रुपयांचे कर्ज - या कार्यक्रमाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहा वर्षात EU च्या लोकसंख्येइतकी लोकसंख्या आज बँकिंगशी जोडली गेली आहे. आज जगामध्ये निम्मे रियल टाईम डिजिटल व्यवहार हे भारतात होत आहेत. भारताचा UPI आयडी आज जगभरातील फिनटेकचे उदाहरण बनला आहे. गाव असो वा शहर, हिवाळा असो किंवा उन्हाळा, भारतात बँकिंग सेवा २४ तास, सात दिवस, बारा महिने अहोरात्र सुरू आहे. जनधन योजनेअंतर्गत महिलांची २९ कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमुळे महिलांसाठी बचत आणि गुंतवणूक करण्याच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. या खात्यांच्या माध्यमातून मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं असून या योजनेच्या ७० टक्के लाभार्थी महिला आहेत, असंही मोदी म्हणाले.
फिनटेकमुळे आर्थिक सेवांचे लोकशाहीकरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढं म्हणाले की, एकेकाळी बँका या फक्त एका इमारतीपुरत्याच मर्यादित होत्या. परंतु आज बँका या प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये आल्या आहेत. याचं कारण फिनटेक आहे. कारण फिनटेक मुळेच हे घडलं आहे. फिनटेकमुळे आर्थिक सेवांचं लोकशाहीकरण झालं आहे. लोक विमा तसंच क्रेडिट सुविधांचा लाभसुद्धा घेत आहेत. भारतामधील फिनटेक इकोसिस्टीम भारतातील लोकांना दर्जेदार जीवनशैली देण्यावर भर देत आहे. यातूनही अजून आपले सर्वोत्तम येणे बाकी आहे. याचा अर्थ असा आहे की, आपली सर्वात मोठी क्षमता अजून समोर येणे बाकी आहे.
५३ कोटींहून अधिक जनधन बँक खाती - मोदी पुढे म्हणाले की, AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या गैरवापराशी संबंधित चिंता फार मोठी आहे. याकरता भारताने AI च्या नैतिक वापरासाठी जागतिक स्तरावर फ्रेमवर्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. फिनटेक क्षेत्राला सरकार मदत करत असून त्याकरता आम्ही काही करही काढले आहेत. संशोधन आणि नवनिर्मितला चालना देण्यासाठी आम्ही १ लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. तसंच सायबर फसवणूक थांबवण्यासाठी आणि डिजिटल साक्षरतेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलावी लागणार आहेत. त्यासोबत फिनटेकसाठी सायबर फसवणूक अडथळा तर ठरणार नाही ना, याची काळजीसुद्धा घेणे आवश्यक आहे. भारतात १८ वर्षावरील क्वचित कोणी असेल ज्याची डिजिटल ओळख म्हणून आधार कार्ड नसेल. फक्त एका दशकात भारतातील ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या ही ६ कोटीवरून ९४ कोटी झाली आहे. आज ५३ कोटींहून अधिक लोकांची जनधन बँक खाती उघडली गेली आहेत. याचा अर्थ १० वर्षात आम्ही संपूर्ण युरोपियन युनियन इतकी लोकसंख्या बँकिंग प्रणालीशी जोडली गेली आहे.
हेही वाचा...