पालघर Hair Found in Monginis Cake : जुना पालघर येथील मच्छी मार्केट समोरील दित्या इंटरप्राईजेस या केक शॉपमध्ये खरेदी केलेल्या केकमध्ये अनेक केस (Monginis Cake) आणि कचरा आढळल्यानं या शॉपला आता महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं नोटीस पाठवली आहे. दरम्यान, या शाखेची मुख्य पेढी असलेल्या भिवंडीतील कार्यालयावर केंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे.
‘ईटीव्ही भारत’च्या बातमीची घेतली दखल : जुना पालघर येथील रस्त्यावर मॉन्जिनीज केकची शाखा आहे. या शाखेतून एका व्यक्तीनं वाढदिवसानिमित्त केक खरेदी केला होता. या केकमध्ये अनेक केस आणि कचरा निघाल्यानं त्यांनी संबंधित शाखेकडं आणि मॉन्जिनीज केकच्या मुख्य कार्यालयाकडं तक्रार केली होती. परंतु, संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. परंतु ‘ईटीव्ही भारत’नं हे प्रकरण लावून धरलं. ‘ईटीव्ही भारत’च्या बातमीची दखल घेऊन आता अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई सुरू केलीय.
अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी : या ग्राहकानं राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडं दाद मागितली. अन्न व औषध प्रशासन विभागानं गेल्या आठवड्यात पालघर येथील मॉन्जिनीज केकच्या शाखेची तपासणी केली, तेव्हा त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. या त्रुटीबाबत संबंधित शाखेला नोटीस बजावण्यात आली. त्यांना १४ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
उत्पादकाची केंद्राकडं तक्रार : पालघरच्या पेढीची मुख्य शाखा असलेल्या 'मॉन्जिनीज' केकच्या दापोडा (तालुका भिवंडी) येथील कार्यालयाकडं अन्न व औषध प्रशासन विभागानं विचारणा केली आहे. या फ्रँचाईजींना केंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना असल्यानं, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं केंद्रीय अन्नसुरक्षा विभागाला याबाबत कळविलं आहे. आणखी आठ दिवसांनी कारवाईबाबत पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात येणार आहे.
‘मॉन्जिनीज’च्या जुना पालघर येथील दित्या इंटरप्राइजेस शाखेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, भेसळ किंवा दर्जाबाबत ग्राहकांची काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 23 62 यावर संपर्क साधता येईल - दत्तात्रय साळुंखे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पालघर
ब्रँड वाढला, गुणवत्ता ढासळली : "मॉन्जिनीज हे केवळ केकचे दुकान नाही. हा ६५ वर्षांच्या आठवणींचा खजिना आहे", अशी जाहिरात जी कंपनी करते आणि भारतभर जिच्या एक हजाराहून अधिक फ्रँचाईसी आहेत, अशा मोठ्या ब्रँड्च्या केकमध्ये एक नव्हे, तर अनेक केस निघाल्यानं वाढदिवसाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं होतं. मॉन्जिनीजने त्याच्या स्वादिष्ट केक आणि पेस्ट्रीसाठी लोकप्रियता मिळवली, परंतु फ्रॅचांईसी जशा वाढल्या, तशी ब्रँडची गुणवत्ता, नावीन्यता आणि ग्राहकांच्या समाधानाप्रती असलेल्या वचनबद्धतेकडं दुर्लक्ष झालं, अशी ग्राहकांची तक्रार आहे.
‘स्लोगन’ वेगळी आणि वागणे वेगळेच : 'मॉन्जिनीज' येथे आम्ही आमची सर्व उत्पादने आणि सेवांबद्दल आमचे प्रेम, काळजी आणि आपुलकी वाढवतो. प्रत्येकाशी एखाद्या प्रिय व्यक्तीप्रमाणे वागतो. तुम्ही स्वप्न बघा, आम्ही ते सत्यात उतरवतो, अशी ‘स्लोगन’ घेऊन मॉन्जिनीजच्या शाखा सुरू होत असल्या तरी, आता तिथे निष्काळजीपणा वाढला असल्याचं पालघरमधील उदाहरणावरून दिसतंय.
'ईटीव्ही'नं पब्लिश केलेली मूळ बातमी -