पालघर Hair Found in Cake : भारतभर एक हजाराहून अधिक फ्रँचाईसी असलेल्या मोठ्या ब्रँड्च्या केकमध्ये एक नव्हे, तर अनेक केस आणि काही प्रमाणात कचरा निघाल्याचं आढळून आलंय. त्यामुळं वाढदिवसाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबाच्या आनंदावर विरजन पडलंय.
मुंबई येथे ब्रँडची स्थापना : प्रसिद्ध केक शॉपचा गौरवशाली इतिहास १९५६ मध्ये सुरू झालाय. मुंबई येथे या ब्रँडची स्थापना केली होती. स्वादिष्ट आणि पेस्ट्रीसाठी या केकनं लोकप्रियता मिळवली, परंतु फ्रँचाईसी जशा वाढल्या, तशी ब्रँडची गुणवत्ता, नावीन्यता आणि ग्राहकांच्या समाधानाप्रती असलेल्या वचनबद्धतेत अडथळे यायला लागले. हे सर्व सांगण्याचं कारणही तसंच आहे. या नावाजलेल्या केकमध्ये चक्क केस आणि कचरा असल्याचं दिसून आलंय.
जाहिरातीमुळं ग्राहक आकर्षित : आम्ही आमची सर्व उत्पादनं आणि सेवांबद्दल आमचे प्रेम, काळजी आणि आपुलकी वाढवतो. प्रत्येकाशी एखाद्या प्रिय व्यक्तीप्रमाणं वागतो. तुम्ही स्वप्न बघा, आम्ही ते सत्यात उतरवतो, अशी टॅगलाईन घेऊन या प्रसिद्ध केकची शाखा सुरू होत असल्या, तरी आता तिथे निष्काळजीपणा वाढला असल्याचं पालघरमधील एका उदाहरणावरून दिसतंय.
स्थानिक शाखेची टाळाटाळ : पालघरमधील प्रसिद्ध केकच्या एका शाखेतून एका व्यक्तीनं वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेतला. पूर्वीच्या अनुभवावरून आणि नावाजलेला ब्रँड असल्यानं हा केक खरेदी केला. कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा करताना केक कापला. त्यावेळी केकमध्ये चक्क केस निघाला. एखादा केस अनवधानाने आला असेल, म्हणून दुर्लक्ष केलं, तर त्यात अधिक केस आणि कचराही निघाला, असं ग्राहकानं सांगितलं. संबंधित ग्राहकानं पालघरच्या ज्या दुकानातून केक खरेदी केला होता, त्यांच्याकडं तक्रार केली तर त्यांनी वरिष्ठ मुख्य कार्यालयाकडं बोट दाखवलं. नंतर वरिष्ठ कार्यालयाकडं तक्रार केली.
अन्न व औषध प्रशासनाकडं दाद : पालघरमधील संबंधित केकच्या फ्रँचाईसी हेड असलेल्या नीरज कुशवाह यांनी ग्राहकाला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर ग्राहकानं अन्न व औषध प्रशासन विभागाकडं तक्रार केली. केक उत्पादन करणारी कंपनी ग्राहकाच्या जीविताशी खेळ करत आहे. मुंबई येथे उत्पादन करणाऱ्या या उत्पादकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहकानं केलीय. ग्राहकानं ऑनलाईन तक्रारही केली आहे.
पालघरमधील ग्राहकाची मॉन्जिनीज केकबाबत तक्रार आली आहे. उत्पादकाचा परवाना राज्य सरकारचा आहे, की केंद्र सरकारचा आहे, हे पाहून कारवाई केली जाईल. संबंधित बेकरी हायजेनिक आहे की, नाही याची तपासणी केली जाईल. याबाबत तक्रार प्राप्त झाली असून, यावर योग्य पाहणी करून कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय साळुंके, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पालघर
सदरची माहिती मला प्राप्त झाली असून, सदर बाब अतिशय गंभीर आहे. कंपनीच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करत आहे. याबाबत कंपनीमध्ये केक बनवताना कुठे हा प्रकार घडला याची तपासणी करणार आहोत, तरी आमच्या कंपनीची झालेली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करत आहे. - नरेश कुशवाह, मॉन्जिनीज एरिया फ्रेंचांयसी एक्झिकेटीव्ह, पालघर/ठाणे
‘एफडीए’नं दखल घ्यावी : प्रत्येक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभाग असतो. किराणा, डेअरी, मॉल, मिठाईची दुकाने, बेकरी, औषध व अन्य संबंधित दुकानांतील निकृष्ट, मुदत संपलेल्या मालाची विक्री होत असेल किंवा भेसळीचा माल विकला जात असेल, तर सामान्यांना तक्रार कुठे करावी हे कळत नाही. त्यामुळं अशा प्रत्येक दुकानाबाबत तक्रार करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा कार्यालयांचे क्रमांक दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याची सक्ती करायला हवी. त्यामुळं सामान्यांना तक्रारी करता येतील आणि या दुकानांवर वचक राहील, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.
हेही वाचा -