मुंबई CM Eknath Shinde : गुरुपौर्णिमेनिमित्तानं सर्वजण आपल्या गुरुला वंदन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. "बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं तळागाळातील सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री झाला. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून नाही तर, त्यांच्या पावलावर जीव ठेवून आम्ही मार्गक्रमण करत आहोत," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2024
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थ येथे चाफ्याच्या फुलांचा पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.… pic.twitter.com/r1GdMb6BxM
मुंबईकर मोकळा श्वास घेणार : "हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. मागील दोन वर्षात सरकारनं विकासाची अनेक कामे केली आहेत. पायाभूत सुविधांचीही कामं केली. यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड आदी प्रकल्प मागील दोन वर्षात या सरकारनं पूर्ण केले आहेत," असे मुख्यमंत्री म्हणाले. "बाळासाहेब नेहमी म्हणायचे मोठमोठ्या इमारती, रस्ते होतील पण लोकांना विरंगुळा घेण्यासाठी उद्यानं झाली पाहिजेत. मला सांगायला आनंद होतोय की, मुंबईतील महालक्ष्मी येथे 120 एकर जमीन सेंट्रल पार्कसाठी घेतली आहे. तर कोस्टल रोडच्या बाजूला 180 एकर जमीन आहे. असे दोन्ही मिळून 300 एकरवर मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क होत आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. हे सेट्रल पार्क मुंबईकरांसाठी ऑक्सिजन ठरणार आहे. म्हणजे बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे काम आम्ही करतोय," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
सरकारचे ऐतिहासिक निर्णय : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल व्हावा म्हणून आम्ही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना आणली. तसेच गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलीला उच्च शिक्षण देता येत नव्हते. पण आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय की, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे. तसेच तीन गॅसही मोफत देतोय. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. त्यामुळं आता आम्ही बारावी, डिप्लोमा आणि पदवीधर यांच्यासाठी स्टायफंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी आज अनेक योजना आणल्या आहेत. या सर्व योजना बाळासाहेबांना अभिप्रेत होत्या. या सर्व योजना सरकारने आणलेला आहेत."
लाडक्या भावासाठी आणली योजना : "आम्ही 'लाडकी बहीण योजना' आणली तेव्हा लाडक्या भावाचे काय? असं विचारण्यात आलं. म्हणून आम्ही लाडक्या भावासाठी पण योजना आणली. परंतु लाडका भाऊ त्यांना किती लाडका आहे माहित नाही. त्यांनी २ वर्षात या योजना का आणल्या नाहीत? या योजना आवश्यक का वाटल्या नाहीत," असं म्हणत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. आता विरोध करण्यासारखे मुद्दे विरोधकांकडं नसल्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली. "लोकसभा निवडणुकीत फेक नेरिटिव्ह तयार करून ते थोडेफार यशस्वी झाले. परंतु, आता त्यांच्याकडं मुद्देच नाहीत. शेवटी "झूट झूट होता है, सच्चाई की हमेशा जीत होती है"," असं मुख्यमंत्री म्हणाले.
आम्हाला यश मिळेल : "विरोधक सरकारच्या योजनांवर टीका करत आहेत. त्यांच्याच कार्यालयावर, शाखांवर 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना यांचे फोटो लागलेत. यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही. स्वतःचा फोटो लावलाय, असा दुटप्पीपणा दिसून येत आहे. मागील दोन वर्षातील कामे आणि त्याआधीच्या सरकारमधील कामे हे जनतेला माहित आहे. झालेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते आम्हाला निवडून देतील," असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार 'गिफ्ट'; अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यात उपक्रम - Uddhav Thackeray Birthday
- 'आमचा पक्ष शिवसेनाच' : निवडणूक आयोगाकडं आम्ही जमा खर्च कशाचा सादर करावा? - Uddhav Thackeray
- निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती? विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग आणि ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता - Shivsena UBT vs EC