छत्रपती संभाजीनगर : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला स्पष्टपणं विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले, "सर्वेक्षण चुकीचं झालं असून त्याआधारे होणारा कायदा योग्य नाही. आमचं म्हणणं ऐकत नाही, तोपर्यंत कायद्यावर सही करू नये," असंही सदावर्ते म्हणालेत.
मराठा समाजाला मागास ठरवू नये : "आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे, की सरकारनं मंजूर केलेल्या मराठा आरक्षणाच्या विधेयकावर सही करू नये. त्यासंदर्भात आम्ही आक्षेप नोंदवले आहेत. जर कायद्यावर सही झाली, तर आम्ही याचिका दाखल करणार आहोत, असंही सदावर्ते म्हणाले आहेत. "हे आरक्षण टिकणारं नाही. हे न्यायालयात तपासले जाईल असं निवृत्त न्यायाधीश म्हणतात. ज्या समितीमध्ये दिलीप भोसले निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यावर भोसलेंकडे उत्तर नव्हते. याचा अर्थ ते सामाजिक मागास नाहीत. विनाकारण कुणी त्याना मागास ठरवू नये."
पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या : 'शरद पवार राजकारण करतात. त्यांनी जरांगे यांना फुगवलं आहे. 2014 मध्ये त्यांनी आरक्षण दिले. ते कुठं टिकलं? त्याहीवेळी आम्ही होतो. जरांगे यांनी मराठा बांधवांना चुकीच्या मार्गानं नेऊ नये. जरांगे यांनी त्यांचं नैराश्य इथं काढू नये. ज्या पोलिसांवर अंतरवलीत हल्ला झाला, त्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्यायला हवं," असंही सदावर्ते म्हणाले आहेत.
''वेशीमध्ये घुसता येत नाही.'' : ''जरांगे हे काय दादा झाले आहेत काय? यापूर्वीही सुद्धा बेकायदेशीरपणे वर्तन करून मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू आणि मुंबईला वेठीस धरू म्हणाले. कायद्याचं उल्लंघन करून वेशीमध्ये घुसता येत नाही. हे मीच दाखवून दिलेलं आहे. 149 ची जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवरच निघालेली आहे, असंही सदावर्ते म्हणाले.
हेही वाचा :
2 मराठा आरक्षण विधेयक न्यायालयात टिकण्याची शक्यता नाही, कायदेतज्ञांच्या मते 'ही' आहेत कारणे
3 मनोज जरांगे पाटील आक्रमक; 24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा