नाशिक Grapes Festival : द्राक्ष उद्योगाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या वतीनं 24 व 25 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून इथं विविध प्रकारचे द्राक्ष, वाईन्सची चव नाशिककरांना चाखता येत असून जिल्हा भरातून नागरिक या महोत्सवाला भेट देत आहेत.
महोत्सवात अनेक प्रकारची द्राक्षे : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नाशिक शहरासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला चांगली बाजारपेठ मिळवून देणं व नाशिकच्या वाईन टुरिझमला चालना देण्याच्या उद्देशानं पर्यटन संचालनालयाच्या वतीनं नाशिकमध्ये ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. नाशिकला द्राक्ष पंढरी असंही म्हटलं जातं. नाशिकची द्राक्षे सर्वदूर प्रसिद्ध आहेत. येथील मातीत असलेले पोषक गुणधर्म व उत्तम हवामानामुळं नाशिकमध्ये द्राक्षांचा हंगाम जोरात असतो. यंदा या फेस्टिवलमध्ये सुधाकर, थॉमसन, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस, क्रिमसन, आर के, सिद्ध गोल्डन बुलेट, अनुष्का, फेल्म, रेड ग्लोब, आर के, सोनाक, क्लोन 2, किंग बेरी अशा अनेक द्राक्षांची चव नाशिककरांना चाखता येत आहे.
द्राक्षांचा महाराजा स्पर्धा : ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवलमध्ये आयोजित द्राक्षांचा महाराजा या स्पर्धेत 112 द्राक्ष उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट द्राक्ष वाण, द्राक्षाची गोडी व रसाळपणा चमक, द्राक्षांची साईज व गुणवत्तेच्या आधारे विजेते निवडण्यात येणार आहेत. ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात विविध जातींचे द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध असून यात जवळपास 30 विक्रेते सहभागी झाले. महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या वाईन्सचे स्टॉल लावण्यात आले असून, यात वाईन प्रदर्शन, वाईन टेस्टिंग करण्यात येत आहे. स्थानिक महिलांना व्यवसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयांनानं 14 महिला बचत गटाचे विविध प्रकारच्या वस्तूचे स्टॉल इथं उभारण्यात आले आहेत.
काय आहे द्राक्ष महोत्सवात : या द्राक्ष महोत्सवात विविध प्रकारच्या द्राक्षांची स्टॉल आहेत. आधुनिक पद्धतीनं द्राक्ष व्यवस्थापन पॅकेजिंग सुद्धा नाशिककरांना इथं बघता येत आहे. तसंच द्राक्ष प्रोसेसिंग करुन तयार केलेले विविध पेय पदार्थ तसंच वाईनची चव चाखण्याची संधी वाईन प्रेमींना उपलब्ध करून देण्यात आलीय. यासोबतच आकर्षक खेळ, लाईव्ह म्युझिक कॉन्टेस्ट व विविध खाद्यपदार्थाची मेजवानी इथं असून नागरिक याचा आस्वाद घेत आहेत.
हेही वाचा :