वाशी (नवी मुंबई) Governor Ramesh Bais : स्नातक झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थ अर्जनासाठी घेऊ नका. ते चारित्र्यसंपन्न व्यक्तित्व घडण्यासाठी शिक्षण घेतलं तरच भारत विश्वगुरू होईल, असं राज्यपालांनी मत व्यक्त केलं. जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. १९) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
युवकांना नवीन वाटा शोधण्याचं आवाहन: "जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा आणि सामोपचाराचा पुरस्कार केला आहे, असं सांगून जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे," असं राज्यपाल रमेश बैस म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत आहे. युवकांनी नाविन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या आणि आपल्या सामर्थ्याचं योग्य नियोजन करावं, असं देखील त्यांनी सांगितलं. राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ तसेच विद्यमान आचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला.
आचार्य महाश्रमण यांचा युवकांना मूलमंत्र : "मनुष्य जीवनात ज्ञानाचे फार महत्त्व आहे. ज्ञानाइतकी दुसरी पवित्र गोष्ट नाही. यासाठी स्नातकांनी ज्ञानसाठी समर्पित व्हावं, असं आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितलं. ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग आणि आळस हे मुख्य अडथळे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदी गुणांचा विकास व्हावा," असंदेखील ते म्हणाले.
राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन : "संस्कार आणि मूल्य शिक्षणाशिवाय चांगले कार्य होणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावं असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. जैन विश्वभारती विद्यापीठाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहन केलं आहे.
दीक्षांत समारोहाला 'या' मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जिओ फिनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष कुंदापूर वामन, के. व्ही. कामत तसेच वेद व जैन आगम शास्त्राचे अभ्यासक प्रा. दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विविध विद्याशाखांमधील पीएच.डी. स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू, साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते.
हेही वाचा:
- Nagpur University Convocation : नागपूर विद्यापीठात सर्वाधिक मेडल प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितला सफलतेचा मंत्र
- Amit Shah Pune Visit : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानचे दीक्षांत समारोह अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न; वाचा प्रत्येक अपडेट्स
- विशेष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 109 वा दीक्षांत समारोह; 146 गोल्ड मेडलची होणार लयलूट