अमरावती Golai Mahadev Temple : श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची जिकडं तिकडं गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावण सोमवारी शिवालय परिसराला यात्रेचं स्वरुप येत आहे. मेळघाटात धारणी तालुक्यातील उंच टोकावर असलेल्या गोलाई गावात सात धबधब्यांचं अनोखं ठिकाण आहे. इथल्या सातपुडा पर्वताच्या कपारीत असलेल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. श्रावण महिन्यात या ठिकाणी 'बम बम बोले' असा जयघोष दुमदुमतो. दोन धबधब्यांच्या मागं कपारीत असणाऱ्या या शिवलिंगाचं दर्शन थरारक अनुभव देणारं आहे. मेळघाटातील धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर असणाऱ्या गोलाई या पर्यटन स्थळाबाबत 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.
![Golai Mahadev Temple](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-08-2024/mh-amr-01-golaee-is-the-best-picnic-and-religious-place-in-melghat-vis-7205575_19082024024833_1908f_1724015913_222.jpg)
सात पहाडांवरुन कोसळते महादेवाची नदी : अमरावती शहरापासून मेळघाटातील गोलाई हे 195 किलोमीटर अंतरावर उंच पहाडावर असणारं ठिकाण आहे. गावाच्या अगदी वेशीवरच खोल दरीमध्ये पहाडाच्या कपारीत शिवलिंग, नंदी यासोबतच या परिसरातील रहिवाशांचं कुलदैवत जीवतामाता अर्थात पार्वती माता देखील आहे. या पहाडाच्यावरुन वाहत येणाऱ्या नदीला महादेवाची नदी असं म्हणतात. ही नदी उंच पहाडावरुन दोन ठिकाणी धबधब्यांच्या स्वरुपात खाली कोसळते. शिवलिंग असणाऱ्या कपारीसमोरुन हे दोन धबधबे खाली कोसळल्यावर पुढं ही नदी खोलदरीत एकूण सात पहाडांवरुन धबधब्यांच्या स्वरुपात कोसळत असल्यामुळे या ठिकाणी एकूण सात धबधबे पाहायला मिळतात. या सात पैकी केवळ दोनच धबधबे गोलाई इथल्या महादेवाच्या कपारी समोरुन दिसतात. इतर पाच धबधबे मात्र स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं मोठा दोर बांधून प्रत्येक धबधब्यातून ओलं होत खाली उतरुन पाहता येतात.
![Golai Mahadev Temple](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-08-2024/mh-amr-01-golaee-is-the-best-picnic-and-religious-place-in-melghat-vis-7205575_19082024024833_1908f_1724015913_768.jpg)
शिवलिंगावर नैसर्गिक जलाभिषेक : गोलाई इथल्या कपारीमध्ये असणाऱ्या शिवलिंगालगत पावसाळ्यात दोन बाजुंनी मोठे धबधबे कोसळतात. पावसाळ्यात शिवलिंग असणाऱ्या कपारीत पाणी असते. मात्र पावसाळा सरल्यावर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात धबधबे कोसळत नाहीत. अशावेळी देखील शिवलिंगाच्या वर असणाऱ्या पहाडाच्या छतावरुन बाराही महिने नैसर्गिक पाणी शिवलिंगावर पडते. त्यामुळे शिवलिंगावर 24 तास बाराही महिने नैसर्गिक जलाभिषेक होतो.
![Golai Mahadev Temple](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-08-2024/mh-amr-01-golaee-is-the-best-picnic-and-religious-place-in-melghat-vis-7205575_19082024024833_1908f_1724015913_737.jpg)
मेळघाटातील भाविकांचं श्रद्धास्थान : नैसर्गिक दृष्ट्या अतिशय सुंदर असणाऱ्या गोलाई इथल्या पहाडाच्या कपारीत असणारं शिवलिंग हे मेळघाटातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. शिवलिंग जवळ असणारी जीवता माता अर्थात पार्वती ही अनेकांचं कुलदैवत आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांसह गवळी समाज बांधव आणि गोलाई आणि लगतच्या राणीगाव, धुळघाट रेल्वे, सुसर्दा या गावातील बंजारा समाज बांधव श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या पर्वावर गोलाई इथल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येतात.
धबधबे आहेत पर्यटकांचं आकर्षण : मेळघाटात अनेक ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. मेळघाटातील सर्वात उत्कृष्ट धबधब्यांचं ठिकाण म्हणून गोलाई प्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात येणारं गोलाई हे गाव अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्याच्या सीमेपासून अगदी जवळ आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याची सीमा देखील गोलाईपासून जवळ आहे. गोलाई इथल्या धबधब्यांची माहिती असणारे पर्यटक श्रावण महिन्यात खास या ठिकाणी धबधबे पाहायला आणि कपारीतील शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात. धबधब्यांमध्ये ओलं होणं यासह महादेवाच्या नदीमध्ये आंघोळ करणं, असा मस्त आनंद लुटण्याचं गोलाई हे उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे.
शासनानं लक्ष दिल्यास वाढेल पर्यटकांची संख्या : अमरावतीवरुन धारणी मार्गानं गोलाईला जाण्यासाठी साडेचार तास लागतात. अकोट मार्गानं मात्र हे अंतर 3 तास 45 मिनिटात गाठता येतं. असं असलं तरी गोलाई ते अकोट दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता अतिशय खराब आहे. या मार्गावर मेळघाटातील अनेक गावांचं स्थलांतरण झालं असून घनदाट अशा या जंगल मार्गावरुन कुठलीच वाहतूक होऊ नये आणि या भागात वाघांसह इतर प्राणी सुरक्षित रहावेत या उद्देशानं या मार्गाचा विकास करण्याची परवानगी मेळघाट व्याघ्र प्रकल्प नाकारली आहे. शासनानं पर्यटन विकासासंदर्भात गोलाईचा विचार केल्यास अमरावती जिल्ह्यातून शेगावला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणारे भाविक अकोटवरुन थेट गोलाईला महादेवाच्या दर्शनासाठी येऊ शकतात. चिखलदरा, कोलकास, सेमाडोह प्रमाणं गोलाईला पर्यटन संकुल निर्माण केल्या गेलं आणि जंगल सफारीची देखील सुविधा करण्यात आली तर मेळघाटातील अतिशय उत्तम पर्यटन केंद्र म्हणून गोलाई नावारूपास येऊ शकते, असं गोलाईसह लगतच्या राणीगाव, धुळघाट रेल्वे या गावातील ग्रामस्थांचं मत आहे.
हेही वाचा :