मुंबई Barfiwala Flyover : अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर पातळीवर जोडण्याचं काम आता पूर्ण झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिलीय. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला 1,397 मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला 650 मिमी वर उचलण्यात आलाय. या जोडणीच्या कामासाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेचे इंजिनियर्स आणि कर्मचारी काम करत होते. तर कॉंंक्रिट क्यूरींगच्या कामानंतर 1 जुलै 2024 रोजी या दोन्ही पुलांवरील वाहतूक सुरू करण्याची तयारी असल्याचं महानगरपालिका प्रशासनानं म्हटलंय.
महानगरपालिका सोशल मीडियावर ट्रोल : पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या गोखले पुलाचा एक भाग 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात कार, ऑटो आणि दुचाकी वाहनांनी पुलाचा वापर केला. पहिल्याच दिवशी वाहनचालकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, पूल खुला केल्यानंतर पालिका सोशल मीडियावर ट्रोल झाली. याचं कारण म्हणजे अंधेरी पश्चिम येथील गोखले पूल सी. डी. बर्फीवाला पुलासोबत अलाइन करण्यात आला नव्हता. तसंच गोखले पुलाची उंची बर्फीवाला पुलापेक्षा दीड मीटरनं जास्त होती. त्यामुळं सोशल मीडियावर पालिकेच्या अभियंता विभागाची खिल्ली उडवली गेली. त्यानंतर यावर उपाय म्हणून पालिकेनं वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेची मदत घेण्याचं ठरवलं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. तर आता हे काम पूर्ण झाल्याचं पालिकेनं म्हटलंय.
पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचं काम झाल्यानंतर त्यापुढील सहा तास सलग पाऊस न पडणं अपेक्षित आणि आवश्यक होतं. विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर सदर परिसरात त्यापुढील 12 तासांपेक्षा अधिक कालावधीदरम्यान पाऊस न पडल्यानं काँक्रिटीकरणाचं आणि स्टिचिंगचं काम विना अडथळा करणं शक्य झालं. या कामानंतर पुलावर 24 तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात येईल. त्यासोबतचा पुलाच्या जोडणी सांध्याचं कामही लवकरच पूर्ण होणं अपेक्षित आहे. यानंतर पुलावर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते कार्य यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार करण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -