अमरावती Amravati Goat Bank : कुटुंबातील कर्त्यापुरुषाची हत्या झाल्यानंतर कुटुंबातील महिला आणि मुलांना सामान्य जीवन जगणं कठीण होते. तर बलात्कारासारख्या घटनेमुळं एखाद्या कुटुंबावर मोठा आघात झाला अशा परिस्थितीत उद्धवस्त होणारे अनेक कुटुंब सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून जातात. अनेकदा अशा घटनेत आरोपी सुटून मोकळे होतात. मात्र ज्यांचे कुटुंब उद्धवस्त होते अशा कुटुंबाचं काय? दरम्यान, या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या बळकट होण्याची संधी मिळावी या उद्देशानं अमरावतीचे प्रवीण खांडपासोळे आणि ज्योती खांडपासोळे यांनी दिशा संस्थेच्या वतीनं 'गोट बँक' ही संकल्पना वास्तवात आणली आहे.
अशी आहे गोट बँक संकल्पना : दिशा संस्थेचे प्रमुख प्रवीण खांडपासोळे 'ई टीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, "गुन्हा पीडित कुटुंबावर होणारा परिणाम अतिशय गंभीर स्वरूपाचा असतो. कोरोना काळात अशा कुटुंबाचे प्रचंड हाल झालेत. त्यांच्या परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करून दिशा संस्थेनं ग्रामीण भागात मोठ्या संख्येनं असणाऱ्या अशा गुन्हा पीडित कुटुंबांना दोन बकऱ्या द्यायच्या ठरवल्या. या बकऱ्यांचे पहिलं पिल्लू आम्ही परत आमच्याकडे घेतो. या पिल्लूमुळं आपण दुसऱ्या कुटुंबाला मदत करू शकतो. अशा गुन्हा पीडित कुटुंबांनी आपल्याकडील बकऱ्या वाढवल्या तर त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळतो. अनेक कुटुंब महिन्याला सहा हजार रुपये या व्यवसायातून मिळवतात. ज्यांच्याकडे काहीही नव्हतं त्यांना जगण्याची नवी उमेद मिळावी, हीच आमची संकल्पना आहे."
बकऱ्यांच्या संख्येत वाढ : गत तीन वर्षांपासून गोट बँक ही संकल्पना राबविली जात आहे. आतापर्यंत 60 कुटुंबांमध्ये एक किंवा दोन बकऱ्या देण्यात आल्या. गुन्हा पीडित कुटुंबांनी हा शेळी पालन व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं केला. आज साठपैकी अनेक कुटुंबांकडे 17 ते 18 च्या संख्येत बकऱ्या झाल्या आहेत. यामुळं या कुटुंबांना आर्थिक सक्षम होण्यास नवा मार्ग मिळाल्याचंही प्रवीण खांडपासोळे म्हणाले.
आर्थिक सक्षम होण्याची जबाबदारी पीडित कुटुंबाचीच : एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुषाचा खून झाल्यावर संपूर्ण जबाबदारी त्याच्या विधवा पत्नीवर येऊन पडते. न्याय मिळण्यासाठी अशा कुटुंबाचा न्यायालयीन लढा सुरूच असतो. मात्र, त्यांच्या पोटापाण्याचं काय? हा महत्त्वाचा प्रश्न आम्हाला कोरोना काळात अशाच एका पीडित महिलेनं केला. आतापर्यंत आम्ही अशा कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करायचो. मात्र आता त्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करतोय, असं दिशा संस्थेच्या ज्योती खांडपासोळे म्हणाल्या.
सहा जिल्ह्यात गोट बँकेचा लाभ : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या वाठोडा खुर्द या गावात दिशा संस्थेने गोट बँक स्थापन केली. या गोट बँकेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासह नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, आणि नांदेड अशा सहा जिल्ह्यातील गुन्हा पीडित कुटुंबांना लाभ मिळालाय. दिशा संस्थेच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील एकूण 15 गुन्हा पीडित कुटुंबांना गोट बँकेद्वारे बकऱ्या देण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 22, नागपूर जिल्ह्यात 5, हिंगोली जिल्ह्यात 12, परभणी जिल्ह्यात 5 आणि नांदेड जिल्ह्यात 7 गुन्हा पिढीत कुटुंबांना गोट बँकेद्वारे मदत मिळाली आहे. तसंच आता या सहाही जिल्ह्यातील एकूण 350 कुटुंबांना लवकरच गोट बँकेद्वारे बकऱ्या दिल्या जाणार असल्याचे ज्योती खांडपासोळे यांनी सांगितले.
दिशा संस्थेचा उद्देश : प्रवीण खांडपासोळे आणि ज्योती खांडपासोळे या दांपत्यानं 2009 ला अमरावतीत दिशा संस्थेची स्थापना केली. गुन्हा पीडितांना न्याय मिळवून देणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. गुन्हा पीडितांच्या वेदना शासन दरबारी पोहोचाव्या यासाठी या संस्थेच्या वतीनं अनेकदा जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येतात. विशेष म्हणजे राज्यभरातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील खांडपासोळे दांपत्य घेतात. निराधार मुलांना न्याय मिळवून देण्यासाठीदेखील ही संस्था कार्य करते.
हेही वाचा -