अमरावती : अमरावतीच्या प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी पल्सर गाडीच्या इंजिनपासून 'गो कार्ट' तयार केली आहे. सहा किलोवॅटच्या डीसी मोटरद्वारे इलेक्ट्रिकल रेसिंग कार्ट तयार करून त्यांनी कोइंबतूर येथे झालेल्या रेसिंग नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेत आठ पारितोषिकं पटकावलीत. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'गो कार्ट' महाविद्यालयासाठी विशेष कामगिरी ठरली असून विद्यार्थ्यांमध्ये देखील या यशस्वी प्रयोगामुळं नवा आत्मविश्वास निर्माण झालाय.
अशी आहे 'गो कार्ट' : इंटर्नल कंबशन इंजिन आणि ईव्ही कॅटेगरीमध्ये पाच ते सहा किलोवॅटची कार्ट बॅटरी आणि मोटरद्वारे महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी तीन महिने परिश्रम घेत 'गो कार्ट' तयार केली. या गोकार्ट बनवण्यासाठी सहभाग घेणारे सर्वच विद्यार्थी हे विविध कंपन्यांमध्ये सध्या सिलेक्ट झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. अभिजीत ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. ईव्ही कॅटेगरीतील कार्टमध्ये खास ब्रेकिंग सिस्टीम लावण्यात आली असून स्लीप टायर वापरण्यात आलेत. विशिष्ट अशा स्प्रिंगचा वापर करून स्टेरिंग सिस्टीम यासोबतच या छोट्याशा कार्टमध्ये अग्निशमन यंत्रणा देखील असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटची विद्यार्थिनी श्रेया अरसोड हिनं दिली.
गो कार्टनं जिंकली आठ पारितोषिकं : कोइंबतूरमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 150 सीसी कार्ट श्रेणीमध्ये महाविद्यालयानं पहिलं स्थान पटकावलं. सिविक आर्ट श्रेणी अंतर्गत मुलींच्या विशेष सहभागाबद्दल प्रथम पारितोषिक मिळालं. पाच किलो वॅट ते सहा किलो वॅट ईव्ही कार्ट श्रेणीतील ऑटो क्रॉस इव्हेंटमध्ये महाविद्यालयाने विजेतेपद पटकावलं. इ कार्ट श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट सांघिक भावना सी व्ही कार्ट श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट नवोक्रम पुरस्कार विजेतेपद देखील राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च यांनी पटकाविलं आहे. यासह दोन रोख पारितोषिकं देखील महाविद्यालयाला मिळालीत.
पुढच्या वर्षी बनवणार मोठी गाडी : यावर्षी अखिल भारतीय पातळीवर आयोजित 'गो कार्ट' स्पर्धेत आमच्या महाविद्यालयानं मिळवलेलं यश हे खरोखरच नेत्रदीपक आहे. प्राध्यापकांच्या योग्य नेतृत्वात विद्यार्थी आणि खास करून विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत ही कौतुकास्पदच. आता पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या स्पर्धेत आमच्या महाविद्यालयाचा सहभाग राहणार असून आता आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणखी मोठी गाडी तयार करतील, असं विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन धांडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा -