पिंपरी चिंचवड (पुणे) Govind Devgiri Maharaj : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान 'गीता भक्ति अमृत महोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सुरुवात झाली. या महोत्सवाचा समारोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
आळंदीनगरी सज्ज : गोविंद देव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आळंदीनगरी सज्ज झालीय. रविवारी सकाळी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आलं. यावेळी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने इंद्रायणीकाठी संतांचा मेळावा भरल्याचीच अनुभूती मिळत होती. जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक करण्यात आला.
तर बाकीच्या सर्व गोष्टी विसरू : पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोविंद देवगिरी महाराज म्हणाले की, परकीय हल्ल्यात 3,500 हिंदू मंदिरे उद्ध्वस्त झाली आहेत. मी आधीच सांगितलं होतं की, तीन मंदिरे शांततेत विलीन झाल्यानंतर इतर मंदिरांकडं लक्ष देण्याची आमची इच्छाही नाही. कारण आम्हाला भविष्यात जगायचं आहे. भूतकाळात जगू नका. देशाचं भवितव्य चांगलं व्हावं, म्हणून ही तीन मंदिरं (अयोध्या, काशी, मथुरा) समजूतदारपणाने आणि प्रेमाने मिळवली तर बाकीच्या सर्व गोष्टी आपण विसरून जाऊ.
गोविंद देव गिरी महाराज यांची 75 वर्षे पूर्ण : आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणासाठी समर्पित करणारे गोविंद देव गिरी महाराज विवेकानंदांसारख्या संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस 'गीता भक्ति दिवस' म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वामीजींच्या दिव्य जीवनाची 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं, संलग्न संस्थांनी 'गीता भक्ति अमृत महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधीचा शुभारंभ, कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कल्याण दासजी महाराज, ह.भ.प. संदीपन महाराज शिंदे आणि ह.भ.प. भास्कर गिरिजी महाराज यांचं कीर्तन झालं.
हेही वाचा -
- राम मंदिर बांधल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याचा तुकडे तुकडे गॅंगचा मनसुबा - गोविंद गिरी महाराजांचं मोठं वक्तव्य
- लोकसभा निवडणुकीकरिता आध्यात्मिक नगरी नाशिकमधून तीन धर्मगुरू इच्छुक, कोणत्या पक्षांकडून मिळणार उमेदवारी?
- महाराष्ट्रीयन गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते पंतप्रधान मोदींनी सोडला उपवास; वाचा कोण आहेत गोविंदगिरी महाराज?