मुंबई Ghatkopar Hoarding Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वेचे तत्कालीन पोलीस आयुक्त मोहम्मद कैसर खालिद यांच्याकडून प्रशासकीय कामात त्रुटी आणि अनियमितता झाल्यानं कैसर खालिद यांचं मंगळवारी निलंबन करण्यात आलं आहे. दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचं कंत्राट दिलेल्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बँक तपशिलांची छाननी करताना दहा ते बारा खात्यांमध्ये अर्शद खान याच्या सांगण्यावरुन 46 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. अर्शद खान याची 15 दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं चौकशी केली होती. अर्शद खान हा आयपीएस अधिकारी कैसर खालीद यांची पत्नी सुम्मना यांच्या एका कंपनीत पार्टनर असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रेल्वे आयुक्त असताना बेकायदेशीर परवानगी : अर्शद खान याची पंधरा दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही. त्यामुळं त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. अर्शद खान हा महपरा गारमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आयपीएस अधिकारी कैसर खालीद यांच्या पत्नीसोबत पार्टनर म्हणून काम बघत असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत असं दिसून आलं की, कैसर खालिद रेल्वे आयुक्त असताना कोणत्याही टेंडरशिवाय इगो मीडियाच्या घाटकोपर येथील चौथ्या होर्डिंगला बेकायदेशीरपणे परवानगी दिल्याबद्दल खालिद देखील विशेष तपास पथकाच्या रडारवर आहेत.
अर्शद खानला इगो मीडियाकडून मोठी रक्कम : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांची पत्नी संचालक असलेल्या कंपनीच्या सहसंचालक असलेला अर्शद खान याची 15 दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात आली होती अशी माहिती एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिली. अर्शद खानला इगो मीडियाकडून काही चेकच्या माध्यमातून 46 लाख 50 हजार इतकी मोठी रक्कम मिळाली होती. मोठ्या रकमेचे चेक इगो मिडियाकडून स्वीकारले होते आणि हे चेक गोवंडी आणि शिवाजी नगर येथील 10 ते 15 व्यक्तींच्या बँक खात्यावर टाकून त्यांना काही टक्के रक्कम देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम काढून घेतली होती, असं विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आलं आहे. अर्शदला इगो मिडियाकडून ही रक्कम काय म्हणून देण्यात आली, तसंच त्यानं या रकमेचं काय केलं याबाबत हे तपास करण्यासाठी अर्शदला पुन्हा चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप तपासात कैसर खालिद यांच्या पत्नी सुम्मना यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेले नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा :