घाटकोपर होर्डिंग प्रकरण : होर्डिंगसाठी सिक्युरिटी डिपॉझिट जीआरपीला भरलं नसल्याचं तपासात उघड - Ghatkopar Hoarding Update - GHATKOPAR HOARDING UPDATE
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. या होर्डिंगसाठी सिक्युरिटी डिपॉझिट जीआरपीला भरलं नसल्याचं तपासात उघडकीस आलंय.
![घाटकोपर होर्डिंग प्रकरण : होर्डिंगसाठी सिक्युरिटी डिपॉझिट जीआरपीला भरलं नसल्याचं तपासात उघड - Ghatkopar Hoarding Update घाटकोपर होर्डिंग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-06-2024/1200-675-21707890-thumbnail-16x9-ghatkopar.jpg?imwidth=3840)
![ETV Bharat Marathi Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jun 14, 2024, 10:30 AM IST
मुंबई Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आलीय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं नुकतेच इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि तिचा साथीदार सागर कुंभार उर्फ सागर पाटील या दोघांना गोव्यातील मांडरेम येथील एका हॉटेलमधून अटक केली. यानंतर आरोपी जान्हवी मराठे हिच्या चौकशीत 40 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घाटकोपर होर्डिंगसाठी जीआरपीला भरलं नसल्याचं उघडकीस आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
अनेक प्रश्न उपस्थित : धक्कादायक बाब म्हणजे 13 मे रोजी ही घटना घडली, त्याच दिवशी पालिकेकडून भावेश भिंडेला नोटीस बजाविण्यात आली. त्या नोटीसमध्ये 6 कोटी 13 लाख 84 हजार 464 रुपयांची दंडाची रक्कम भरण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते. या नोटीसप्रमाणे पालिकेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र राज्य पोलीस हौसिंग वेलफेअरच्या जागेवर भिंडेनं कुठलीही परवानगी न घेता 8 एप्रिल 2022 पासून 8 होर्डींग्ज उभारल्याचं म्हटलं आहे. जाहिरात फलक बाबतच्या महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 328 नुसार जाहिरात शुल्क, विलंब आणि दंड अशी एकूण 6 कोटींची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या आहे. हे यापूर्वी का दिले नाही? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी : गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं पालिकेच्या एन वॉर्डचे इंजिनिअर सुनील दळवी यांची चौकशी केली. एन वॉर्डच्या लायसन्स अधिकारी आणि इतर लिपिकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं विशेष तपास पथकाला मिळाली नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. 40 लाख सिक्युरिटी डिपॉझिट जीआरपीला न भरुन देखील इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं घाटकोपर इथं भलंमोठं होर्डिंग उभारलं होतं. तसंच जीआरपीला इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दरमहा 13 लाख रुपये भाडं देखील भरलं जात होतं. सिक्युरिटी डिपॉझिट न घेता बेकायदेशीर पद्धतीनं जीआरपी 13 लाख महिन्याचं भाडं कसे काय वसूल करत होतं? हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :
- घाटकोपर होर्डिंग प्रकरण : जीआरपीच्या एसीपीचा नोंदवला जबाब; उद्या भिंडेला करणार न्यायालयात हजर
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या 16 वर पोहोचली, बड्या अधिकाऱ्याचा पत्नीसह मृतदेह कारमधून काढला बाहेर
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : उदयपूरमध्ये लपलेल्या भावेश भिंडेला पोलिसांनी आणलं मुंबईत, दुपारी करणार न्यायालयात हजर