सातारा : कराड तालुक्यातील उंडाळे गावात घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात १३ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. अंकेत श्रीगोविंद सिंग, असं मृत मुलाचं नाव आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील हे कुटुंब व्यवसायाच्या निमित्तानं उंडाळे गावात वास्तव्यास आहे. स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस तसंच फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पत्र्याच्या शेडमधील सिलिंडरचा स्फोट : कराड-चांदोली मार्गावर उंडाळे गावातील बालीश पाटील यांची वस्ती आहे. त्याठिकाणी मृत मुलाचं कुटुंब वास्तव्यास आहे. पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी घरगुती गॅस सिलिंडर ठेवला होता. तेथून जवळच अंकेत सिंग हा मुलगा अंघोळ करत होता. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन टाकी आणि शेडचा पत्रा मुलाच्या डोक्यावर आदळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सिलिंडर स्फोटाची तिसरी भीषण घटना : कराड शहरात यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर स्फोटाच्या दोन भीषण घटना घडल्या होत्या. याच वर्षाच्या सुरूवातील १८ जानेवारी २०२४ रोजी कराडच्या बुधवार पेठेतील घरात सिलिंडरचा स्फोट होऊन सात जण जखमी झाले होते. त्यातील एका महिलेचा उपचादरम्यान मृत्यू झाला होता. मागील वर्षी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी मुजावर कॉलनीतील शक्तीशाली स्फोटात ९ जण जखमी आणि ७ घरे उद्ध्वस्त झाली होती. त्या स्फोटातील गंभीर जखमी दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आज (मंगळवारी) उंडाळे येथे सिलिंडर स्फोटाची तिसरी घटना घडली आहे.
फॉरेन्सिक टीमची घटनास्थळी धाव : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडल्यानं पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. कराड ग्रामीण पोलीस तसंच साताऱ्याहून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून माहिती गोळा करत या स्फोटाचा कसून तपास सुरू केला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचाच स्फोट असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे.
हेही वाचा -