ठाणे Garlic Price Hike : वरण असो वा भाजी, त्याला लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु हाच लसूण आता 500 पार झाल्यानं गृहिणींच्या किचनचे बजेट साफ कोलमडले आहे. मध्यंतरी कांदे आणि त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर यांचे भाव आभाळाला भिडले होते त्यातून जरा कुठे सुटका होईल असं वाटत असतानाच लसणाचे भाव कडाडले. परंतु लज्जतदार खायचे असेल तर लसूण लागतोच. त्यामुळे तो कितीही महाग झाला तरी लसूण खरेदी करावाच लागतो अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली आहे.
लसणाची फोडणी महागली : लसूण हा अत्यंत गुणकारी आणि जेवणाची लज्जत वाढविणारा जिन्नस असून त्याशिवाय जेवण अपूर्ण असतं. लसणाच्या झणझणीत फोडणीचा सुगंध जरी आला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटतं. त्यातच हृदय सुदृढ ठेवण्यासाठी देखील लसूण अत्यंत गुणकारी असतो. दररोज लसणाच्या पाकळ्या जेवणात घ्याव्यात असे डॉक्टर सांगतात परंतु इथे लसणाचे भाव आभाळाला भिडल्यानं ताटातून काय, लसूण आता आहारातूनच गायब झाला आहे. लसणाची मागणी असताना आवक घटली म्हणून लसणाचे भाव आता तब्बल रु 500 वर गेला आहे. यावर्षी खराब हवामानामुळं लसणाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले. त्यातच गेल्यावर्षीचा लसूण संपला असून, यावर्षीचा लसूण अजून बाजारात आला नसल्यानं टंचाई निर्माण झाली आहे असे जाणकारांनी सांगितले.
लसणाचे उत्पादन कमी : दरम्यान, उटीचा लसूण, गावठी, जे 2 आणि अमलापूर असे लसणाचे प्रकार असून बहुतांश लसूण हा मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून येतो. महाराष्ट्रात त्यामानाने फारच कमी प्रमाणात लसणाचे उत्पादन होते. किरकोळ बाजारात काही दिवसांपूर्वी लसूण हा जवळपास 300 रुपये प्रति किलो भावाने विकला जात होता, तोच आता 500 रुपये प्रतिकिलो विकला जात असल्यानं सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालं आहे. हॉटेलमध्ये देखील स्टार्टर म्हणून किंवा मद्यपान करताना अनेकांना गार्लिक फ्राय खायला आवडते परंतु आता लसणाचे भाव आकाशाला भिडल्यानं खवय्यांना गार्लिक फ्राय वर पाणी सोडावं लागणार आहे.
हेही वाचा -