मुंबई Gangster Prasad Pujari : भारतातून 2005 मध्ये फरार झालेला कुख्यात गँगस्टर कुमार पिल्लई गॅंगचा म्होरक्या प्रसाद पुजारी याला भारतात आणण्यास मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. मध्यरात्री कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलंय. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणासाठी चीन बरोबर कागदोपत्री प्रक्रिया सुरु केली होती. अखेर एका वर्षानंतर मुंबईत 15 पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याला भारतात आणण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
चिनी महिलेशी केलं लग्न : कुख्यात गुंड प्रसाद पुजारी यानं चीनमध्ये लपलेला असताना आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव एका चिनी महिलेशी लग्न केलं. प्रसाद पुजारीला या महिलेपासून एक चार वर्षाचा मुलगा देखील आहे. मुंबई गुन्हे शाखेनं यापूर्वीच प्रसाद पुजारीच्या आईला 2020 मध्ये अटक केली होती. 2005 मध्ये भारतातून पलायन केलेल्या कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याला 2008 मार्चमध्ये चीन देशात तात्पुरते वास्तव्य मिळालं होतं. मिळालेल्या तात्पुरत्या वास्तव्याची 2012 मार्चमध्ये वैधता संपली होती. तसंच पुजारीचा रिजेक्ट विजा देखील मे 2008 मध्येच एक्सपायर झाला होता. मात्र, चिनी महिलेशी लग्न केल्यानंतर शेंजेन शहरातील लुओहू इथं तो राहत होता. विक्रोळी परिसरात शिवसेनेचे कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यावर 19 डिसेंबर 2019 ला गोळीबार झाला होता. या गोळीबारात चंद्रकांत जाधव यांना एक गोळी शरीराला चाटून गेली होती, त्यामुळं त्यांचा जीव वाचला. या प्रकरणात गँगस्टर प्रसाद पुजारीचं नाव समोर आलं होतं.
प्रसाद पुजारीवर अनेक गुन्हे दाखल : चीनमध्ये अटक केलेल्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला गेल्या वर्षीपासूनच चांगलाच वेग आला होता. मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यात पुजारीविरोधात जवळपास 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनच्या अधिकाऱ्यांनी हाँगकाँगमधून मार्च 2023 मध्ये ताब्यात घेतलं होतं. मुंबईत प्रसाद पुजारीविरोधात खंडणी, खून तसंच खुनाचा प्रयत्न असे विविध गुन्हे आधीच दाखल आहेत. त्यामुळं पुजारी सुपर वॉन्टेड आरोपी होता. बनावट पासपोर्ट असल्याच्या आरोपाखाली हाँगकाँगमध्ये अटकेत असलेल्या पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला जोर धरला होता.
हेही वाचा :